चाकण - बहुळ (ता. खेड) गावच्या हद्दीत जमिनीच्या वादातून उसाचे शेत पेटविले. या प्रकरणी एका महिलेवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस बंदोबस्तात ऊसतोडणी सुरू असताना उसाचे शेत पेटविण्यात आले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : ही घटना शनिवार, दि. ९ मार्च रोजी सकाळी पावणेबाराच्या सुमारास बहुळ गावच्या हद्दीत जमीन गट नं. ११० मध्ये घडली. याबाबत शोभा दिनकर काळे (रा. फ्लॅट नं. ६, पांचाळेश्वर हौसिंग सोसायटी, शाहूनगर, चिंचवड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सुमन सत्यवान खलाटे (रा. खलाटेवस्ती, बहुळ, ता. खेड) या महिलेवर भादंवि कलम ४३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी : काळे कुटुंबीयाने बहुळ येथील कैलास काळुराम पानसरे व प्रभाकर मारुती पानसरे यांची जमीन खरेदीखताने विकत घेतली असून, खरेदीपासून काळे यांचा ताबा व वहिवाट आहे. या ठिकाणी त्यांनी विहीर खोदून जमिनीची लेवल करून उसाचे पीक घेतले आहे. ऊस तोडणीस आला असून गेल्या सहा महिन्यांपासून जमिनीचे मूळ मालक सत्यवान विठ्ठल खलाटे व त्यांच्या घरातील लोक वाद घालीत असल्याने वेळोवेळी तक्रारी देण्यात आल्या आहेत.वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शखाली चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.खलाटे यांच्या भीतीमुळे काळे यांनी उसाच्या पिकाकडे जाणे-येणे बंद केले होते; मात्र ऊसतोडणीकरिता कायदेशीर सशुल्क भरून पोलीस बंदोबस्त घेतला असता ऊसतोडणी चालू असताना सुमन सत्यवान खलाटे या शोभा काळे यांना म्हणाल्या, की ऊसतोडणी बंद करा, नाहीतर मी ऊस पेटवून देईन, असे म्हणून आगपेटीतील काडी पेटवून उसाच्या पाचटावर टाकून ऊस पेटवून दिला.
जमिनीच्या वादातून उसाचे शेत पेटवले, बहुळ येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 12:33 AM