मधुबनी – महिलांवरील वाढत्या अत्याचारामुळे अनेकजण चिंतेत आहे. बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात झंझारपूर येथील स्थानिक कोर्टाने महिलेशी छेडछाड आणि अश्लिल वर्तवणूक करणाऱ्या एका आरोपीला सुनावलेली शिक्षा सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. कोर्टाने या आरोपीला गावातील सर्व महिलांचे कपडे धुण्याचे आदेश दिले आहेत. याच अटीवर कोर्टात आरोपीला जामीन मंजूर केला आहे.
कोर्टाने या प्रकरणात सुनावणी करताना म्हटलंय की, पुढील ६ महिने आरोपीने गावातील सर्व महिलांचे कपडे धुवावे जेणेकरून त्याच्या मनात महिलांप्रती आदर निर्माण होऊ शकेल. इतकचं नाही तर आरोपीने महिलांचे कपडे धुवून झाल्यानंतर ते प्रेस करून घरोघरी जाऊन ते परत करावेत असंही कोर्टाने सांगितले आहे. न्या. अविनाश कुमार यांनी या प्रकरणात सुनावणी करत २० वर्षीय आरोपी ललन कुमारला फटकारत महिलांचा सन्मान करण्यास सांगितले आहे.
या प्रकरणाची सुनावणी सुरु असताना कोर्टाने आरोपीला विचारले की, तो कुठला व्यवसाय करतो. त्यावर त्याने धोबीकाम करत असल्याचं सांगितले. तेव्हा कोर्टाने महिलांचे कपडे धुण्याचे आदेश दिले. गावात जवळपास २००० महिलांची लोकसंख्या आहे. म्हणजे आरोपीला पुढील ६ महिने २००० महिलांचे कपडे मोफत धुवावे लागणार असून त्यानंतर त्याला इस्त्री करून त्यांना परत करावे लागतील. तसेच आरोपी ललन योग्यप्रकारे कोर्टाच्या आदेशाचं पालन करतोय की नाही हे पाहण्याची जबाबदारी गावातील सरपंच अथवा ग्रामसेवक यांच्याकडे राहील.
आरोपी ललनला त्याने केलेल्या मोफत कामाबद्दल सरपंच अथवा ग्रामसेवकाकडून प्रमाणपत्र आणून ते कोर्टात सादर करावं लागेल. कोर्टाने अटी-शर्थींसह दिलेला जामीन अर्जाची कॉपी सरपंच आणि गावातील प्रमुखांकडे पाठवला आहे. लौकहा पोलीस ठाण्यात ललन कुमार याच्याविरोधात १९ एप्रिलरोजी छेडछाड आणि महिलांशी गैरवर्तवणूक करण्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. लौकहा पोलीस ठाण्याचे संतोष कुमार मंडल यांनी सांगितले की, १७ एप्रिलला रात्री गावातील एका महिलेसोबत छेडछाड आणि तिच्याशी गैरवर्तवणूक करण्याचा प्रयत्न आरोपी ललन कुमारने केला होता. १८ एप्रिलला पीडित महिलेने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर ही पुढील कारवाई करण्यात आली.