मध्य प्रदेशातील कटनी येथे पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली एका युवकाला अटक केली आहे. लग्नासाठी पैशाची गरज भासल्याने आरोपीने चोरी केली. चोरीचा प्लॅन रचला, तो अंमलात आणण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आणि जेलमध्ये पाठवलं. पोलिसांनी आरोपीकडून रोख रक्कमेशिवाय मोबाईल, दुचाकीही जप्त केली.
कटनी जिल्ह्यातील बडवारा तालुक्यात मध्य प्रदेश ग्रामीण बँकेत काही दिवसांपासून चोराने बँकेंची भिंत तोडून १ लाख २७ हजार २१२ रुपये चोरी केले होते. ज्याची तक्रार बँकेचे मॅनेजर यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात केली. या प्रकरणात पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली. त्यानंतर अवघ्या ७२ तासांत पोलिसांनी अगदी शिताफीने आरोपीला अटक करत त्याला लग्नमंडपाऐवजी जेलमध्ये पाठवलं.
पोलीस निरीक्षक अंकित मिश्रा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार विशेष पथक नेमत या प्रकरणाचा तपास सुरु केला. पोलिसांना मिळालेल्या सूचनेवरुन त्यांनी रोहनिया गावातील सुभाष यादव या २९ वर्षीय युवकाला ताब्यात घेतलं. हा युवक त्याच्या मित्रांना पार्टी देत होता. संशयाच्या आधारे पोलिसांनी सुभाषला ताब्यात घेत कसून चौकशी सुरु केली. तेव्हा पोलिसांसमोर युवकाची बोबडी वळाली. त्याने सर्वकाही सत्य पोलिसांसमोर सांगितले. मीच बँकेत चोरी केल्याचं आरोपीने कबुल केले.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने लग्नासाठी ही रक्कम चोरी केली होती. त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे संधी मिळताच त्याने ६ आणि ७ जानेवारीला रात्री मध्य प्रदेश ग्रामीण बँकेची भिंत तोडून त्याठिकाणाहून १ लाख २७ हजार रुपये चोरले. चोरलेल्या रक्कमेपैकी पोलिसांनी १ लाख १४ हजार रोकड आणि चोरीच्या पैशातून खरेदी केलेला मोबाईल, घटनेत वापरण्यात आलेली बाईक, सुटकेस जप्त केली आहे. आरोपीला पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत पाठवले. आर्थिक तंगी असल्याने आणि अलीकडेच त्याचे लग्न ठरले होते. त्यामुळे आरोपीने अनेक दिवसांपासून बँकेत चोरी करण्याची योजना आखली. चोरी करण्यात आरोपीला यश आलं परंतु अवघ्या काही तासांतच पोलिसांनी आरोपीला जेरबंद केला.