Madhya Pradesh Rape in Rewa Circuit House: मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील सर्किट हाऊसमध्ये बलात्काराची खळबळजनक घटना समोर आली आहे. सर्किट हाऊसमध्ये जबरदस्तीनं दारू पाजून हायप्रोफाइल प्रवचनकार महंत सीताराम दास यांनी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपी बडी गड्डी येथील साधू असून तो सध्या रेवा येथून फरार झाला आहे.
अतिरिक्त एसपी शिवकुमार शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीताराम बाबा उर्फ समर्थ त्रिपाठी यानं रीवामधील सर्वात पॉश परिसर असलेल्या सर्किट हाऊसमध्ये त्याच्या साथीदारांच्या मदतीनं ही घटना घडवून आणली. आरोपी बाबाचा शिष्य विनोद पांडे याला पोलिसांनी अटक केली आहे. घटना घडल्यानंतर बाबा फरार झाला आहे. १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या हनुमान कथा महोत्सवात सहभागी होण्यासाठी आरोपी रेवा येथे आले होते.
१ एप्रिलपासून सिरमौर चौकाचौकात संकटमोचन हनुमान कथा होणार आहे. या कथेत श्री रामजन्मभूमी न्यासचे माजी सदस्य आणि माजी खासदार रामविलास वेदांती यांच्यासह महंत सीताराम दास महाराज देखील उपस्थित राहणार होते. या कार्यक्रमाचे मोठमोठे बॅनरही शहरात लावण्यात आले आहेत, मात्र कार्यक्रमाआधीच वेदांती महाराजांच्या शिष्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी १६ वर्षीय पीडित तरुणीनं सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित मुलगी सतना येथील रहिवासी आहे.
नेमकं काय घडलं?रेवा पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, विनोद पांडेनं संबंधित पीडितेला फोन करुन सतना येथून रीवा येथे बोलावलं होतं. विनोद पांडे याला याआधीही एका प्रकरणात शिक्षा झाली आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे देखील दाखल आहेत. सोमवारी रात्री विनोदचे दोन साथीदार पीडितेला आपल्यासोबत सर्किट हाऊसमध्ये घेऊन गेले. यानंतर विनोदनं तिला सर्किट हाऊसच्या चार क्रमांकाच्या खोलीत घेऊन नेलं. या खोलीत बाबा आणि त्यांचा एक शिष्य धीरेंद्र होते आणि ते सगळे मिळून मद्यपान करत होते. मुलीला दारू पाजण्याचाही प्रयत्न त्यांनी केला. तिनं नकार दिल्यावर जबरदस्तीनं तिला दारू पाजली. त्यानंतर बाबा आणि पीडित मुलगी सोडून सगळे बाहेर गेले आणि बाहेरून दरवाजा बंद करण्यात आला. यानंतर बाबानं पीडितेवर बलात्कार केला.
आरोपी साधूची अनेक नेते आणि बिल्डरांसोबत ओळखजिल्ह्यातील बडे नेते, उद्योगपती आणि बांधकाम व्यावसायिकही बाबांचे निकटवर्तीय असल्याचं सांगितलं जातं. मिळालेल्या माहितीनुसार, सीताराम दास ज्या ज्यावेळी रीवा येथे यायचे तेव्हा त्यांना भेटण्यासाठी या बड्या लोकांची रिघ लागलेली असायची. यावेळीही ते एका बिल्डरच्या फोनवरूनच रीवा येथे आले होते. समदिया बिल्डर्सच्या ज्या कार्यक्रमासाठी बाबा आले होते, त्या कार्यक्रमाची निमंत्रणपत्रं देखील छापण्यात आली होती.
आरोपी साधू फरारआरोपीचे गुरू आणि श्री रामजन्मभूमी न्यासचे माजी सदस्य आणि माजी खासदार रामविलास वेदांती यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम रीवा येथील समदिया मॉलच्या उद्घाटनप्रसंगी होणार आहे. १ एप्रिल ते १० एप्रिल या कालावधीत हनुमान कथा व अष्टोत्तर शत रुद्राभिषेकाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. याच्या तयारीसाठी वेदांती महाराजांचे आरोपी शिष्य सीताराम दास रेवा येथे आले होते. त्याचे निमंत्रण देण्यासाठी त्यांनी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची भेट घेतली होती आणि आता तो रेवा येथून फरार आहे.