नवी दिल्ली - मध्य प्रदेशच्या बैतूलमध्ये एक अजब घटना समोर आली आहे. रुसलेल्या प्रेयसीला खूश करण्यासाठी प्रियकराने तिच्याच घरी चोरी केल्याची घटना घडली आहे. प्रियकराने सुरुवातीला प्रेयसीच्याच घरात चोरी केली. नंतर तिचं सामान परत केल्याची विचित्र घटना समोर आली. मात्र यावेळी प्रियकराने आपला जीव धोक्यात घालून हे सामान चोरट्यांकडून परत मिळवल्याचा बनाव रचला होता. या अजब घटनेमुळे प्रेयसीचा राग गेला की नाही हे माहित नाही. पण अशाप्रकारे चोरी करणं प्रियकराला चांगलंच महागात पडलं आहे. कारण पोलिसांनी चौकशीनंतर थेट त्याची तुरुंगात रवानगी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बैतूलच्या महावीर वॉर्डातील एका घरात 2 मार्चच्या रात्री चोरी झाली होती. या चोरीची कल्पना संबंधित कुटुंबालाही नव्हती. कारण ज्यादिवशी चोरी झाली त्या दिवशी संबंधित घरातील सर्व सदस्य बाहेरगावी गेले होते. घरातील सर्व सदस्य जेव्हा घरी परतले, तेव्हा त्यांच्या घराशेजारी राहणारा प्रेम खडसे नावाचा मुलगा हातात काही सामान घेऊन चोरी झालेल्या घरासमोर उभा होता. तसेच प्रेमने प्रेयसीच्या कुटुंबीयांना तुमच्या घरात चोरी करून दोन चोरटे पळून जात होते. त्यावेळी मी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं.
चोरट्यांनी माझ्यावर हल्ला केला आणि लॅपटॉप व काही दागिने तिथेच टाकून चोरट्यांनी पळ काढल्याचं देखील त्याने सांगितलं. प्रियकराच्या या बनावावर परिसरातील अनेकांनी विश्वास ठेवला. यानंतर पीडित परिवाराने घरात चोरी झाल्याची माहिती पोलिसांना दिली. एसडीओपी (मुलताई) नम्रता सोंधिया यांच्या दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला प्रेमच्या बोलण्यात अनेक तफावती आढळल्या होत्या. तसेच त्याने सांगितलेली गोष्ट खोटी वाटत होती. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला.
पोलिसांनी प्रेमची कसून चौकशी केली असता त्याने खरी माहिती उघड केली आहे. त्याने पोलिसांना सांगितलं की, ज्या घरात त्याने चोरी केली आहे. त्या घरात त्याची प्रेयसी राहते. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याच वाद होत होते. त्यामुळे प्रेयसीच्या नजरेत पुन्हा हिरो होण्यासाठी हा कट रचल्याची माहिती दिली. पोलिसांनी प्रेमच्या घराची झडती घेतली. यावेळी प्रेमच्या घरातील स्पीकरमध्ये चोरी केलेल्या वस्तू आणि 92 हजार रुपये रोख आणि सोन्याचे दागिनेही सापडले आहेत. यानंतर पोलिसांनी आरोपी प्रेमला न्यायालयात हजर केलं असून आता त्याची रवानगी थेट तुरूंगात केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.