आईच्या डोळ्यात तिखट टाकून मुलाचे अपहरण; आरोपींचा एन्काउंटर, मुलगा सुखरुप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 16:35 IST2025-02-16T16:35:15+5:302025-02-16T16:35:40+5:30
20 मिनिटांपर्यंत दोन्ही बाजूंनी 6 राऊंड गोळ्या झाडण्यात आल्या.

आईच्या डोळ्यात तिखट टाकून मुलाचे अपहरण; आरोपींचा एन्काउंटर, मुलगा सुखरुप
Madhya Pradesh Crime :मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ग्वाल्हेरमध्ये शिवाय गुप्ता नावाच्या शालेय विद्यार्थ्याचे अपहरण झाले होते. आता या प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या अपहरणाशी संबंधित दोन आरोपींना पोलिसांनी चकमकीनंतर अटक केली. चकमकीदरम्यान दोन्ही आरोपींच्या पायाला गोळी लागली असून, सध्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आईच्या डोळ्यात तिखट टाकून अपहरण
अपहरणाची घटना दोन दिवसांपूर्वी ग्वाल्हेरच्या सीपी कॉलनी येथील जैन मंदिरासमोर घडली होती. सहा वर्षीय शिवाय त्याच्या आईसोबत बसची वाट पाहत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी डोळ्यात मिरची पावडर टाकून त्याचे अपहरण केले. या घटनेनंतर त्याचे वडील राहुल गुप्ता यांनी तात्काळ मुरार पोलिस ठाण्यात मुलाच्या अपहरणाची तक्रार दाखल केली.
यानंतर पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी सुरू केली. पोलिसांनी आरोपीचे मुरैना जिल्ह्यातील लोकेशन ट्रेस केले. यानंतर आरोपींनी पकडले जाण्याच्या भीतीने शिवायला तिथेच सोडून पळ काढला. पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी पाठलाग केला, यादरम्यान अल्पशा चकमकीनंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. 20 मिनिटांपर्यंत दोन्ही बाजूंनी 6 राऊंड गोळ्या झाडण्यात आल्या. बंटी गुर्जर आणि राहुल गुर्जर अशी आरोपींची नावे असून, दोन्ही दोघेही मुरैनाचे रहिवासी आहेत. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही जप्त केली आहे.