अभिलाष खांडेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, भोपाळ: मनोरुग्ण असलेल्या एका व्यक्तीने गाढ झोपेत असलेल्या आठ कुटुुंबीयांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली व त्यानंतर गळफास लावून आत्महत्या केली. जीवाचा थरकाप उडविणारी ही घटना मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात बुधवारी पहाटे घडली. या हत्याकांडाबद्दल मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शोक व्यक्त केला आहे.
बोदल कछार या गावात घडलेल्या या हत्याकांडामागचे नेमके कारण समजू शकलेले नाही. दिनेश गोंड (२६) याची मानसिक स्थिती बिघडलेली होती. त्याचा गेल्या २१ मे रोजी विवाह झाला होता. त्याने आपली पत्नी, आई, बहीण, भाऊ, वहिनी, तीन लहान मुले अशा आठ जणांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. दिनेशने आपल्या भाच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला; पण जखमी झालेला भाचा त्याच्या तावडीतून निसटला व तिथून पळून गेला. मृतांमध्ये चार वर्षे आणि एक वर्षाच्या दोन मुलींचाही समावेश असून त्या दिनेशच्या भाच्या होत्या.
त्यानेही घेतला गळफास
- या हत्याकांडाची माहिती मिळताच पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी हल्लेखोर दिनेशचा शोध सुरू केला. तो घरापासून जवळच असलेल्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला.
- त्याने गळफास लावून आत्महत्या केली होती अशी माहिती पोलिस अधीक्षक मनीष खत्री यांनी दिली. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत.
हत्याकांड झालेल्या गावाचा मुख्यमंत्री दौरा करण्याची शक्यता
मध्य प्रदेशच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी खात्याच्या मंत्री संपतिया उइके यांनी हत्याकांड घडलेल्या बोदल कछार या गावी जाऊन दिनेशच्या इतर नातेवाईकांची व स्थानिक नागरिकांची भेट घ्यावी असे आदेश मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिले. यादव हे या गावाचा दौरा करण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.