भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंड पुकारत भाजपामध्ये प्रवेश केला. यामुळे काँग्रेसचे कमलनाथ सरकार अल्पमतात आले आहे. शिंदे समर्थक आमदारांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला असून २२ आमदारांना बंगळुरुमध्ये ठेवण्यात आले आहे.
यापैकी एका बंडखोर आमदाराच्या मुलीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. शिदे समर्थक आमदार सुरेश धाकड यांची मुलगी ज्योती हिने आत्महत्या केली आहे. राजस्थानमधील सासुरवाडीला ज्योतीने गळफास लावून घेतला. कारण अद्याप समजू शकलेले नाही.
धाकड यांचा राजीनामा मध्य प्रदेश विधानसभा अध्यक्षांनी बंडखोर आमदारांसह काल रात्रीच मंजूर केला आहे. मुलीच्या आत्महत्येचे वृत्त समजताच धाकड हे चार्टर्ड विमानाने राजस्थानला निघाले आहेत.
मध्यप्रदेश विधानसभेत सायंकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. त्यासाठी विधानसभा अध्यक्षांना विशेष सत्र बोलविण्याची सूचना न्यायालयाने केली आहे. त्यामुळे राज्यातील काँग्रेसचे भवितव्य आता बंडखोर 16 आमदारांवर निर्भर आहे. मात्र मुख्यमंत्री कमलनाथ यांना अजुनही आपले सरकार वाचवता येऊ शकते.