दमोह : मध्य प्रदेशातील दमोह येथे गुरुवारी सकाळी सहा वाजता आयकर विभागाने टाकलेला छापा (Damoh Income Tax Raid) शुक्रवारी रात्री नऊ वाजता संपला. राज्यातील विविध ठिकाणच्या पथकांनी जवळपास 39 तास राय कुटुंबाच्या दहाहून अधिक ठिकाणी छापे टाकले.
प्रत्यक्ष छापा संपल्यानंतर जबलपूरच्या आयकर विभागाचे सहआयुक्त मुनमुन शर्मा यांनी सांगितले की, या कुटुंबाकडून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांची तपासणी भोपाळमध्ये केली जाईल. कारवाई संपल्यानंतर येथून किती रोकड, किती दागिने व इतर वस्तू जप्त करण्यात आल्याची माहिती विभागाने दिलेली नाही.
शर्मा यांनी सांगितले की, छाप्यादरम्यान नोटांनी भरलेल्या पिशव्या पाण्याच्या कंटेनरमध्ये फेकल्या गेल्या होत्या, त्या जप्त करण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसांत तपास पूर्ण झाल्यानंतर या छाप्याची संपूर्ण माहिती दिली जाईल.
दरम्यान, राय कुटुंबावर दोन दिवसांपासून सुरू असलेल्या आयकर छाप्यात दोन मनोरंजक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये आयकर अधिकारी पाण्याच्या टाकीतून पैशांनी भरलेली बॅग बाहेर काढत आहेत. त्याचवेळी, दुसऱ्या व्हिडिओमध्ये एक कोटी रुपयांच्या दोन हजार आणि 500-500 रुपयांच्या नोटा हेअर ड्रायरने वाळवल्या जात आहेत. जेणेकरून विभागातील अधिकाऱ्यांना त्याची मोजणी करता येईल.
रोख रक्कम, दागिने आणि इतर वस्तू जमा केल्यानंतर आता आयकर विभागाचे पथक कागदपत्रांची छाननी करणार आहे. याचबरोबर, राय बंधूंनी बेहिशेबी संपत्ती कोठून कमावली, हा पैसा करचुकवेगिरीचा आहे की आणखी काही आहे, याचा तपास आयकर विभागाचे अधिकारी कागदपत्रांच्या माध्यमातून करणार आहेत.