तिरंगा प्रिंटेड शूज विकल्याबद्दल Amazon सेलरवर FIR; अॅक्शन होणारच! गृहमंत्र्यांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 11:02 AM2022-01-26T11:02:11+5:302022-01-26T11:02:43+5:30
गृहमंत्री मिश्रा यांच्या निर्देशानंतर सहा तासांच्या आतच मंगळवारी अॅमेझॉन कंपनीशी संबंधित सेलरवर हबीबगंज येथील शुभम नायडू यांनी एफआयआर दाखल केली. नायडू एका खासगी कंपनीत काम करतात.
भोपाळ - मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे अॅमेझॉनच्या विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनापूर्वी अमेझॉन या ई-कॉमर्स कंपनीने तिरंग्याचा गैरवापर केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अॅमेझॉन प्लॅटफॉर्मवर तिरंगा छापलेले शूज विकल्याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी कारवाईचे निर्देश दिले.
गृहमंत्री मिश्रा यांच्या निर्देशानंतर सहा तासांच्या आतच मंगळवारी अॅमेझॉन कंपनीशी संबंधित सेलरवर हबीबगंज येथील शुभम नायडू यांनी एफआयआर दाखल केली. नायडू एका खासगी कंपनीत काम करतात.
प्रजासत्ताक दिनानिमित्त अॅमेझॉनच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सेल सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या सेलसोबतच राष्ट्रध्वज छपलेले शूज विक्रीचे फोटोही देण्यात आले आहेत. सोशल मीडिया यूजर्स याप्रकरणी कंपनीविरुद्ध कारवाईची मागणी करत आहेत. राज्याचे गृह मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी यासंदर्भात माहिती मिळताच मंगलवारी कंपनी विरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत. मिश्रा म्हणाले, त्यांनी या संपूर्ण प्रकरणात डीजीपीना FIR दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
असे कृत्य सहन केले जाणार नाही -
मिश्रा म्हणाले, अॅमेझॉन कंपनीबाबत जी माहिती समोर आली आहे, ती वेदनादायक असून मध्य प्रदेशात हे खपवून घेतले जाणार नाही. देशाचा अपमान होईल, असे कोणतेही कृत्य सहन केले जाणार नाही. पोलीस कारवाई केली जाईल, असे गृह मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी स्पष्ट केले आहे. तसेच यापूर्वीही राज्यात ऑनलाइन ड्रग्सची डिलीव्हरी करण्याचा मुद्दाही गाजला होता.