सरकारी शाळेतील शिक्षकाकडे सापडले कोट्यवधीचं घबाड; ३५ कॉलेजचा मालक, ४ बंगले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 11:08 PM2022-03-27T23:08:18+5:302022-03-27T23:08:39+5:30
आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी प्रशांत परमार याच्या १२ हून अधिक ठिकाणी छापेमारी केली आहे
ग्वालियार – मध्य प्रदेशातील ग्वालियर शहरात कोट्यधीश सहायक शिक्षकाच्या घरावर टाकलेल्या धाडीत आर्थिक गुन्हे शाखेला मोठं घबाड सापडलं आहे. प्रशांत परमार असं या शिक्षकाचे नाव असून त्याच्या नावावर ३५ कॉलेज आहेत. EOW नं प्रशांत परमार यांच्या घरावर कारवाई करत लाखोंची रोकड, शेकडो पॅनकार्ड जप्त केले आहेत. सध्या या प्रकरणात आणखी तपास करण्याचं काम तपास यंत्रणा करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील एका सरकारी शाळेत सहायक शिक्षक पदावर काम करणाऱ्या व्यक्तीकडे इतकी मालमत्ता पाहून अधिकारीही हैराण झाले आहेत. या शिक्षकाकडे ३५ हून अधिक कॉलेज असल्याचं समोर आले आहे. सत्यम टॉवरमध्ये राहत असलेल्या प्रशांत परमार याच्याकडे बेकायदेशीर संपत्ती जमवल्याचा आरोप करण्यात आला आहे. २००६ मध्ये ३५०० रुपये महिना पगार असणाऱ्या प्रशांत परमारनं अवघ्या १५ वर्षात ही माया जमवल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी प्रशांत परमार याच्या १२ हून अधिक ठिकाणी छापेमारी केली आहे. प्रशांत परमारकडे ३५ हून अधिक कॉलेज, ४ कार्यालय, २ बंगले, जमीन आणि बँक अकाऊंट, लॉकर्स सापडले आहेत. ग्वालियरमध्ये आतापर्यंत सर्वात मोठी ही कारवाई आहे. प्रशांत परमार यांच्याबाबत आलेल्या तक्रारीनंतर हा तपास करण्यात आला होता. २००६ मध्ये नोकरी करणारा प्रशांत परमार १५ वर्षात ३५ हून अधिक कॉलेजचा मालक असल्याचं समोर आले आहे. प्रशांत परमारकडे ४ कार्यालये आणि एक मॅरेज गार्डनही आहे.
मूळचा राजस्थानच्या बाडी येथील तो रहिवासी आहे. त्याच्या संपत्तीचं नेटवर्क झारखंडपर्यंत पसरले आहे. या कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांनी प्रशांत परमारच्या घरी अनेक सरकारी कार्यालयाचे कागदपत्रे आणि अधिकाऱ्यांचे स्टॅम्प सील सापडले. त्यामुळे बनावट स्टॅम्पच्या माध्यमातून त्याने हा गोरखधंदा सुरू केल्याचं सांगितले जात आहे. आतापर्यंत १० कोटीहून अधिक बेनामी संपत्ती असल्याचा खुलासा झाला आहे. इतकेच नाही तर पुढील वर्षी होणाऱ्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत उभं राहण्याची प्रशांत परमार तयारी करत होता.