चार कोटींचा बंगला, पाच किलो चांदी, 3.5 लाखांची रोकड, PWD इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 03:47 PM2021-07-10T15:47:51+5:302021-07-10T15:49:39+5:30
...याच बरोबर भोपाळ आणि ग्वाल्हेरमध्ये त्यांचे फ्लॅटदेखील आहेत.
ग्वाल्हेर - मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे शुक्रवारी एका सरकारी इंजिनिअरच्या घरावर ईओडब्ल्यूने छापा टाकला. यात, पीडब्ल्यूडीच्या या इंजिनिअरकडे चार कोटी रुपयांचा बंगला, पाच किलो चांदी, 3.5 लाख रुपयांची रोकड आणि इतरही कोट्यवधी रुपयांचे घबाड समोर आले आहे. गेल्या काही दिवसांत मध्य प्रदेशात, सामान्य कमाई असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर संपत्ती असल्याच्या अनेक घटना समोर अल्या आहेत.
पीडब्ल्यूडीच्या इंजिनिअरकडे घबाड -
ईओडब्ल्यूच्या टीमने ग्वाल्हेरमधील डीबी सिटी येथे राहणाऱ्या पीडब्ल्यूडीमधील इंजिनिअर रविंद्र सिंह कुशवाहच्या घरावर छापा टाकला. यात मोठे घबाड समोर आले आहे. या इंजिनिअरच्या ग्वाल्हेर येथील घराची किंमत चार कोटी रुपये एवढी आहे. याच बरोबर भोपाळ आणि ग्वाल्हेरमध्ये त्यांचे फ्लॅटदेखील आहेत. सुरुवातीच्या तपासात रोख साडेतीन लाख रुपये, जवळपास 250 ग्राम सोन्याचे दागिने, पाच किलो चांदी आणि मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टीची कागदपत्रे मिळाली आहेत.
भोपाळमध्ये एफसीआयचा क्लर्क कोट्यधीश -
गेल्या मे महिन्यात एफसीआयमध्ये लाचेच्या तक्रारीनंतर सीबीआयने भोपाळमध्ये एका क्लर्कच्या घरावर छापा टाकला होता. या क्लर्ककडेही कोट्यवधींची संपत्ती समोर आली होती. क्लर्क किशोर मीणाने आपल्या घरातच लॉकर तयार करून घेतले होते. एवढेच नाही तर नोटा मोजायचे मशीनही आणले होते. हे लॉकर उघडल्यानंतर पोलिसांना 3.01 कोटी रोख, 387 ग्राम सोनं आणि 600 ग्रॅम चांदी दिसत होती. सीबीआयने एका खासगी सुरक्षा एजन्सीच्या तक्रारीवरून ही कारवाई केली होती.