नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना या समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता पुन्हा एकदा समोर आली आहे. आईला घाबरून एका अल्पवयीने मुलाने टोकाचं पाऊल उचललं आहे. थेट छतावरून उडी मारून आपलं जीवन संपवल्याची घटना घडली आहे. आई ओरडेल या भीतीने मुलाने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली आहे. मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे. मुलाला आई खूप ओरडेल ही भीती सतावत होती त्यातून त्याने हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये मुलाचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तेजाजी पोलीस ठाण्याच्या परिसरात ही घटना घडली. तपास अधिकारी धर्मेंद्र अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 वर्षीय मुलगा आपल्या घरामध्ये खेळत होता. त्याच वेळी काही कारणामुळे त्याची आई त्याला रागावली. यानंतर तो तिथेच बसून राहिला. थोड्या वेळाने पुन्हा एकदा आईने त्याला आवाज दिला. तेव्हा मुलगा खूप घाबरला आणि छताच्या दिशेने धावत सुटला. आई ओरडेल आणि मारेलही अशी त्याला भीती होती. याच भीतीपोटी त्याने छतावरून उडी मारली.
मुलाच्या मृत्यूने कुटुंबीयांना मोठा धक्का
मुलगा इमारतीवरून खाली पडल्यानंतर नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. जेथून त्याला उपचासाठी सीएचएल येथे पाठवण्यात आले. जवळपास एक तास उपचार केल्यानंतर उपचारादरम्यानच मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मुलाचा अशा रितीने मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना देखील मोठा धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून काही लोकांची चौकशी करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.