iPhones Loot : मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात 12 कोटी रुपयांचे 1600 iPhone लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 15 ऑगस्ट रोजी ट्रक चालकाला ओलीस ठेवून हा सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. या घटनेनंतर चालकाने थेट पोलीस स्टेशन गाठले. पण, पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यास नकार दिला. हे प्रकरण आयजी मनोज वर्मा यांना समजल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल न करणाऱ्या टीआय आणि एएसआयला तात्काळ निलंबित केले.
14 ऑगस्टची घटनामिळालेल्या माहितीनुसार, 14 ऑगस्ट रोजी ट्रक चालक हैदराबादहून iPhone घेऊन दिल्लीकडे रवाना झाला. कंटेनरमध्ये त्याच्यासोबत एक सुरक्षा रक्षकही होता. लखनादोनजवळ आणखी एक गार्ड ट्रकमध्ये चढला. चालकाला झोप येत होती, त्यामुळे त्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उभी केली. दुसऱ्या दिवशी, म्हणजे 15 ऑगस्टला ड्रायव्हरला जाग आली, तेव्हा त्याचे हात, पाय व तोंड बांधलेले होते. कसेबसे त्याने स्वतःची सुटका केली आणि कंटेनरमध्ये पाहिले असता सर्व iPhone चोरी झाल्याचे निदर्शनास आले.
मेवात टोळीवर संशयघटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शुक्रवारी दिवसभर घटनेशी संबंधित पुरावे गोळा करण्यात आले. पोलिसांनी लखनाडोन-झाशी महामार्गावरील टोलनाक्यांवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आहे. ॲपल कंपनीचे अधिकारी, वाहतूक कंपनी, सुरक्षा रक्षकांसह अनेकांची चौकशी करण्यात आली आहे. या घटनेत मेवाती टोळीचा हात असल्याचा संशय आहे. त्याआधारे आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत.