प्रेयसीची गळा चिरुन हत्या, 11 दिवस 5 राज्यात फिरला; एका चुकीमुळे पोलिसांच्या हाती लागला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 01:32 PM2022-11-20T13:32:05+5:302022-11-20T13:33:47+5:30
प्रेयसीची गळा चिरुन हत्या केल्यानंतर आरोपीने हत्येचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता.
जबलपूर:मध्य प्रदेशातील जबलपूर येथील एका रिसॉर्टमध्ये तरुणीची हत्या करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी बऱ्याच दिवसांपासून पोलिसांची दिशाभूल करत होता. आरोपीने मुलीच्या एटीएम कार्डमधून पैसे काढले तेव्हा त्याचा शोध लागला. आरोपी राजस्थानमध्ये असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत शनिवारी तेथून त्याला ताब्यात घेतले. यादरम्यान आरोपीचे खरे नाव हेमंत भदाडे असल्याचे समोर आले.
खोट्या नावाने हॉटेलमध्ये राहिला
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हेमंत भदाडे मृताच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एकामागून एक नवीन पोस्ट करत होता. त्याने व्हिडिओ पोस्टद्वारे खुनाची कबुलीही दिली होती. या सोशल मीडिया पोस्टमुळे त्याला पकडण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पोलिसांनी सांगितले की, हेमंत भदाडे हा अभिजीत पाटीदार या नावाच्या आयडीने हॉटेलमध्ये राहत होता. त्याने तरुणीच्या एटीएम कार्डमधून 1 लाख 52 हजार रुपये काढले. यानंतर त्याचे लोकेशन समजले.
आरोपीने खुनाचा व्हिडिओ बनवला
आरोपी हेमंत भडादेने प्रेयसीची गळा चिरुन हत्या केल्यानंतर व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओत त्याने तरुणीने त्याच्यासोबत विश्वासघात केल्याचे सांगत होता. तसेच, त्याने तरुणीच्या हत्येसाठी तिलाच जबाबदार धरले. याशिवाय, ती तरुणी त्याला ब्लॅकमेल करत असल्याचेही तो म्हणाला. यानंतर त्याने प्रेयसीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून व्हिडिओ अपलोड केला. मात्र, काही वेळाने आरोपीने हा व्हिडिओ डिलीट केला होता.
11 दिवसात 5 राज्यात फिरला
गुन्हा केल्यानंतर आरोपी सतत इकडून तिकडे फिरत होता. तो सर्वात आधी छत्तीसगडमधील रायपूरला गेला. तिथून महाराष्ट्रातील नागपूर, हिमाचल, चंदीगड आणि नंतर अजमेर येथे गेला. आरोपीने अजमेरमधील एटीएममधून पैसे काढले तेव्हा त्याचे लोकेशन कळले, त्यानंतर पोलिसांनी त्याला राजस्थानमधील सिरोही येथून बसमध्ये पकडले.