मध्य प्रदेशच्या छिंदवाडा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. जी ऐकून तुम्हालाही धक्का बसेल, याठिकाणी डॉक्टरने उपचारानंतर रुग्णाला फी मागितली त्यावर संतापलेल्या रुग्णाने डॉक्टरांच्या हाताची बोटं दातामध्ये पकडून तोडून टाकली. पीडित डॉक्टरने याबाबत पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली आहे. याप्रकरणी दोन युवकांना अटक करण्यात आली आहे. तर ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला.
हे प्रकरण छिंदवाडा येथील कुंडीपुरा पोलीस हद्दीत येते, येथे शनिचरा बाजारमध्ये डॉक्टर एस. के बिंद्रा यांचे रुग्णालय आहे. शनिवारी रात्री उशिरा एक रूग्ण भाजलेला हात घेऊन उपचारासाठी बिंद्रा यांच्या रुग्णालयात पोहचला, त्यावेळी रात्रीचे १२ वाजले होते, रुग्णासोबत अन्य २ व्यक्तीही होते, जखमी रुग्णावर बिंद्रा आणि त्याच्या हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी उपचार केले. त्यानंतर जेव्हा डॉक्टरांनी रुग्णाकडे फीचे पैसे मागितले तेव्हा ते पैसे देण्यास नकार देण्यात आला.
यानंतर रुग्ण आणि त्याच्या साथीदारांनी रुग्णालयाची तोडफोड केली, त्यानंतर डॉक्टर बिंद्रा रुग्णाजवळ पोहचले, तेव्हा त्याच्यासोबत असणाऱ्या विजय तिवारी नावाच्या व्यक्तीने डॉक्टरांच्या हाताच्या बोटांचा चावा घेऊन ती वेगळी केली. डॉक्टर एस के. बिंद्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री १२ च्या सुमारास ३ व्यक्ती माझ्याकडे उपचारासाठी आले होते, त्यात विजय युइके, विजय तिवारी आणि तिसऱ्याचं नाव माहिती नाही, विजय युइकेने दारुच्या नशेत हातात जळती राख पकडली होती, त्यामुळे त्याचा हात भाजला होता. त्याच्यावर उपचार करण्यात आले.
उपचारानंतर ज्यावेळी आम्ही त्यांच्याकडे पैशांची मागणी केली तेव्हा त्यांनी फी देण्यास नकार दिला. त्यानंतर रुग्णाने त्याच्या मित्रांना बोलावले, यातील एक मित्र आला आणि हॉस्पिटलमध्ये अश्लिल शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. आमच्या हॉस्पिटलमधील सामानाची तोडफोड केली, मी म्हणालो की, तुम्ही चुकीचं करत आहात, हे योग्य नाही. इतक्यात त्या व्यक्तीने माझ्या डाव्या हाताची बोटं त्याच्या दातात दाबली आणि १५-२० सेकंदातच माझ्या बोटाचा वरचा भाग वेगळा केला. घडलेल्या प्रकारानंतर मी पोलीस ठाण्यात तक्रार केली आणि जिल्हा रुग्णालयात आपल्या हातावर उपचार केले आहेत.
डॉक्टर बिंद्रा यांनी कुंडीपुरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. याबाबत छिंदवाडाचे एसपी संजीव उइके यांनी सांगितले की, डॉक्टरांनी रुग्णावर उपचार केले त्यानंतर फी मागितली, यावरून दोघांमध्ये भांडणं झाली, आकाश तिवारीने शिवीगाळ केली तर विजय तिवारीने डॉक्टरांच्या हाताचा चावा घेतला, या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या पोलिसांनी २ युवकांना अटक केली आहे तर तिसऱ्याचा शोध सुरू आहे.