मध्य प्रदेशातील इंदूर इथं पोलिसांनी भिकाऱ्यांच्या अशा टोळीला पकडलं आहे जे राजस्थानाहून मध्य प्रदेशात भीक मागायला येत होते. या २२ जणांची टोळी शहरातील विविध भागात दिवसभर भीक मागायची आणि रात्री हॉटेलमध्ये मुक्काम करायची. २२ जणांमध्ये ११ लहान मुलांचाही समावेश आहे. या सर्वांना ताब्यात घेत पुन्हा राजस्थानला पाठवण्यात आले आहे.
महिला आणि बालकल्याण विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मंगळवारी मिळालेल्या एका तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास केला. या तपासात राजस्थानहून २२ जणांची टोळी भीक मागण्यासाठी इंदूरला आल्याचं समोर आले. हे सर्व लोक एकाच हॉटेलमध्ये मुक्कामाला होते. त्यात ११ अल्पवयीन मुलांचाही समावेश होता तर इतर महिला होत्या. हे लोक शहरातील विविध ठिकाणी दिवसभर भीक मागत होते आणि त्यानंतर रात्री हॉटेलमध्ये जाऊन झोपत होते असं त्यांनी म्हटलं.
या सर्व लोकांना समज देऊन राजस्थानच्या त्यांच्या मूळगावी सोडून देण्यात आले आहे. शहरातील सर्व हॉटेल, लॉज आणि इतर विश्रामस्थळांना पोलिसांकडून निर्देश देण्यात आले आहेत. भीक मागणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला हॉटेलमध्ये जागा देऊ नये अन्यथा संबंधितांवर योग्य ती कारवाई करू असं पोलिसांनी म्हटलं. केंद्र सरकारच्या विधी व न्याय विभागाकडून इंदूरसह देशभरातील १० शहरांत भिक्षावृत्ती मुक्त अभियान प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे इंदूर शहरात भीक मागणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे.
इंदूरमध्ये पकडली लखपती महिला भिकारी
काही महिन्यांपूर्वी जेव्हा इंदूरमध्ये भिकारीमुक्त अभियान चालवले तेव्हा एका महिलेला पकडण्यात आले. ही महिला तिच्या २ मुलांसह भीक मागण्याचं काम करत होती. उज्जैन रोडवरील लवकुश चौकात ती भीक मागायची. त्या महिलेने केवळ २ महिन्यात भीक मागून अडीच लाख रुपयांची कमाई केली होती. त्यातील १ लाख रुपये तिच्या सासू सासऱ्यांना पाठवले. तपासात या महिलेची विविध ठिकाणी संपत्ती असल्याचेही उघड झाले. या महिलेकडे १ जमीन, २ मजली घर, एक बाईक, २० हजारांचा स्मार्टफोन आढळला. ही महिलाही राजस्थानची असल्याचं समोर आले होते.