धक्कादायक! पोलिसांवर दगडफेक, जळते फटाके फेकले; 'या' ठिकाणी परिस्थिती गंभीर, घटनेने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 02:25 PM2021-10-20T14:25:11+5:302021-10-20T14:29:44+5:30
Unruly elements created ruckus in jabalpur : गर्दी पांगवण्यासाठी आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचीही मदत घ्यावी लागली. पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली.
जबलपूर - मध्य प्रदेशच्या जबलपूर शहरात मंगळवारी काही लोकांनी खूप गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांवर दगडफेक करतानाच जळते फटाकेही फेकण्यात आले आहे. यामुळे पोलिसांनी देखील स्वसंरक्षणासाठी जमावावर लाठीचार्ज करावा लागला. तसेच गर्दी पांगवण्यासाठी आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचीही मदत घ्यावी लागली. पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. काही काळ यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जबलपूरमधल्या मच्छी बाजार परिसरात ही घटना घडली. मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्ताने मिलाद-उन-नबी साजरी करण्यासाठी येथे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मोठ्या संख्येने लोक मशिदीत नमाज अदा करण्यासाठी गोळा होत होते. एकाच मार्गाने जाण्यासाठी पोलीस त्यांना विनंती करत होते. संवेदनशील भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात पोलीसही सावध होते.
पोलिसांनीही लाठीचार्ज करत अश्रुधुराचा वापर केला
जबलपूरचे जिल्हा पोलीस अधिक्षक सिद्धार्थ बहुगुणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मच्छी बाजार हा संवेदनशील भाग आहे. त्यामुळे इथे मोठ्या संख्येत पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मात्र, अचानक काही लोकांनी पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक सुरू केली. तसेच जळते फटाकेही पोलिसांवर फेकण्यात आले. यानंतर पोलिसांनीही लाठीचार्ज करत अश्रुधुराचा वापर केला.
दगड फेकणाऱ्या लोकांची ओळख पटवण्यात यश
जिल्हाधिकारी कर्मवीर शर्मा यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांवर जळते फटाके आणि दगड फेकणाऱ्या लोकांची ओळख पटवण्यात यश आलं आहे. अशा उपद्रवींविरोधात कठोर कारवाई केली जाईल, जेणेकरून भविष्यात अशा घटना घडू नये असं देखील त्यांनी म्हटलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.