पश्चिम बंगालमधील केजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून हत्या झाल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला. आरोपी संजय रॉयला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून विरोधकही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या परगना येथील मध्यमग्राममध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. यावेळी संतप्त जमावाने आरोपीच्या घराची आणि त्याच्या नातेवाईकाच्या दुकानाची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून परगना येथील मध्यमग्राममध्ये संतप्त जमावाने आरोपीच्या घराची आणि त्याच्या नातेवाईकाच्या दुकानाची तोडफोड केली. यावेळी जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
स्थानिक टीएमसी पंचायत सदस्याच्या घरावरही हल्ला करण्यात आला आहे. पंचायत सदस्याच्या पतीने मध्यस्थाची भूमिका बजावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तसेच भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी पश्चिम बंगालमधील महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून ममता सरकारवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.