नवी दिल्ली : 200 कोटींच्या खंडणीप्रकरणी अडकलेल्या सुकेश चंद्रशेखरनंतर आता त्यांची पत्नी आणि फिल्म अॅक्ट्रेस लीना मारिया पॉल (Leena Maria Paul) हिला दिल्लीपोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. याची माहिती पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. लीनाविरोधात सबळ पुरावे मिळाल्याने तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी तिची काही तास चौकशी केली. लीना ही तेलगू, तामिळ सिनेमांमध्ये छोटे-छोटे रोल करत होती. ('Madras Cafe' actress Leena Maria Paul Arrested in fraud case of 200 crore.)
एआयडीएमकेचे निवडणूक चिन्ह मिळवून देण्याच्या आरोपाखाली तिचा पती सुकेश चंद्रशेखर हा तिहार जेलमध्ये आहे. त्याने तुरुंगातूनच रेलिगेअर कंपनीचे प्रमोटर मलविंदर आणि शिविंदर सिंग यांच्या पत्नींसोबत एक अशी डील केली की, या मलविंदर आणि शिविंदर सिंग यांना जेलमधून बाहेर काढेल. यासाठी त्याने त्यांच्याकडून करोडो रुपये उकळले होते.
या दोन महिलांना गृह मंत्रालयाचा बोगस अधिकारी भेटला, त्याने चंद्रशेखरच्या सांगण्यावरून हे पैसे उकळले. शिविंदर सिंगची पत्नी आदिती आणि मलविंदरची पत्नी जापना यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार दिली होती. यामध्ये आपल्या पतींना जेलमधून बाहेर काढण्याच्या नावाखाली आपल्याकडून करोडो रुपये उकळण्यात आले. फोन करणाऱ्याने आपल्याला एक मोठा अधिकारी असल्याचे सांगितले. तसेच मलविंदरला तुरुंगातून बाहेर काढण्याची ऑफर दिली. या ठगांनी हाँगकाँगच्या एका बँक अकाऊंटमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले, असे म्हटले आहे.
लीना मारिया पॉलला पोलिसांनी याआधीही अनेकदा अटक केली होती. या अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत मिळून 2013 मध्ये एका बँकेला फसविले होते. सुकेशच्या कोठडीत छापा टाकून पोलिसांनी दोन मोबाईल गेल्या महिन्यात जप्त केले होते. तो जेलमधूनच मोठमोठ्या उद्योगपतींच्या संपर्कात होता. तसेच तेथूनच तो सर्वोच्च न्यायाल, उच्च न्यायालयातील प्रकरणे मिटविण्याचा दावा करत होता.