मीरारोड - अमली पदार्थ विकणारे माफिया हे हातात तलवारी घेऊन आपला काळाधंदा करत असल्याचा प्रकार घोडबंदर भागात अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत समोर आला आहे . पोलिसांनी ५ तलवारींसह ८ लाखांचे मेफेड्रॉन जप्त केले असून तिघांना अटक केली आहे.
मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या अमली पदार्थ विरोधी कक्षातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर सह अनिल पवार , वसीम शेख , गणेश वनवे असे पोलीस पथक रविवारी पहाटे गस्त घालत असताना घोडबंदर आरटीओ जवळील शिफ्टिंग वसाहत येथून ५ जण चालले होते. पोलिसांनी हटकले असता पळू लागले. पोलिसांनी तिघांना पाठलाग करून पकडले . तर दिघेंजण त्यांच्या कंदील तलवारी टाकून पळाले.
पोलिसांना ५ तलवारी आणि ८० ग्रॅम इतके ८ लाखांचे मेफेड्रॉन हे अमलीपदार्थ सापडले. पोलिसांनी संदीप नांगरे (३२), सूर्यकांत करळकर (२७) व शाकिर सय्यद (३४) ह्या तिघांना अटक केली असून हे सर्व घोडबंदर शिफ्टिंगमध्ये राहणारे आहेत. काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे . जब्बार व साहिल हे फरार आरोपी आहेत . पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन पोतदार करत आहेत.