Mahadev Betting App : गेल्या काही काळापासून चर्चेत आलेल्या महादेव बेटिंग ॲपप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अभिनेता साहिल खानला मुंबई न्यायालयाने 1 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सायबर सेलच्या एसआयटीने शनिवारी साहिलला छत्तीसगडमधील जगदलपूर येथून ताब्यात घेतले होते. दरम्यान, मुंबई पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात आतापर्यंत 2000 हून अधिक सिमकार्ड आणि 1700 बँक खात्यांचे तपशील जप्त केले आहेत.
याप्रकरणी दुसरी अटक यापूर्वी 6 जानेवारी रोजी मुंबई पोलिसांनी बेटिंग ॲप प्रकरणात दीक्षित कोठारी नावाच्या आरोपीला अटक केली होती. मुंबईतून अटक करण्यात आलेला साहिल खान हा दुसरा आरोपी आहे. या वादग्रस्त प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली असून, ती महादेव बेटिंग ॲप आणि रिअल इस्टेट कंपनीमधील अवैध आर्थिक व्यवहार शोधणार आहे. महादेव बॅटिंग ॲप प्रकरणी साहिल खान आणि अन्य 31 जणांविरुद्ध चौकशी सुरू आहे.
15 हजार कोटी रुपयांचा घोटाळाएसआयटी काही आर्थिक आणि रिअल इस्टेट कंपन्या आणि वादग्रस्त महादेव बेटिंग ॲपच्या प्रवर्तकांमधील कथित बेकायदेशीर व्यवहारांची चौकशी करत आहे. गेल्या वर्षी न्यायालयाच्या आदेशानंतर माटुंगा पोलिसांनी महादेव बेटिंग ॲपबाबत एफआयआर नोंदवून या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली होती. एफआयआरनुसार हा सुमारे 15,000 कोटी रुपयांचा घोटाळा आहे.
ईडी आणि मुंबई पोलिसांचा तपास सुरूपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान आरोपींची बँक खाती, मोबाईल फोन, लॅपटॉप आणि सर्व तांत्रिक उपकरणांची माहिती गोळा केली जात आहे. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) महादेव सट्टेबाजी ॲप प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगच्या अँगलने तपास करत आहे. त्याचबरोबर मुंबई पोलिसांनी 32 जणांविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. छत्तीसगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो (ACB) आणि आर्थिक गुन्हे शाखे (EOW) ने सांगितले की,या प्रकरणात अनेक ज्येष्ठ राजकारणी आणि नोकरशहा यांचाही सहभाग असल्याचे मानले जात आहे.
ॲपवर केंद्राने घातली बंदी 5 नोव्हेंबर 2023 रोजी केंद्र सरकारने महादेव बेटिंग ॲपसह 22 बेकायदेशीर बेटिंग ॲप्स आणि वेबसाइट्स ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते. ईडीच्या शिफारशींनंतर माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69 ए अंतर्गत आदेश जारी करण्यात आले. महादेव ॲप प्रकरण तेव्हा चर्चेत आले, जेव्हा ईडीने कॅश कुरिअरचे ईमेल स्टेटमेंट रेकॉर्ड केल्याचा दावा केला, ज्याने उघड केले की, छत्तीसगडचे तत्कालीन मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी यूएई-आधारित ॲप प्रवर्तकांकडून कथितपणे 508 रुपये घेतले होते कोटी घेतले होते. मात्र, बघेल यांनी आरोप फेटाळून लावले.
आतापर्यंत किती तपास झाला?ईडीपूर्वी छत्तीसगड पोलिसांनी महादेव ॲपविरोधात तपास सुरू केला होता. मीडिया रिपोर्टनुसार, छत्तीसगड पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 75 एफआयआर नोंदवले आहेत. तर 429 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 15 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात ईडीने सांगितले होते की, या प्रकरणी रायपूर, भोपाळ, मुंबई आणि कोलकाता येथील 39 ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. आतापर्यंतच्या छाप्यांमध्ये ईडीने 417 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. याशिवाय ईडीने फरार संशयितांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटही जारी केले आहे.