बंगळुरूच्या महालक्ष्मीच्या मृतदेहाचे ३० तुकडे फ्रीजमध्ये सापडले होते. या प्रकरणी तिच्या नवऱ्याने अशरफ नावाच्या व्यक्तीशी प्रेसंबंध होते, त्यानेच हत्या केली असावी असा संशय व्यक्त केला होता. परंतू तो खून अशरफने नाही तर ती ज्या कपड्याच्या दुकानात काम करायची त्याच दुकानातील कर्मचाऱ्याने केल्याचे समोर आले आहे. अटकेच्या भीतीने या आरोपीने ओडिशाला मुळ गावी जात आत्महत्या केली आहे. आता या आरोपीच्या आईने महालक्ष्मीवर मुलाला प्रेसंबंधात अडकविल्याचा आरोप केला आहे.
मुक्ती रंजन प्रताप रे असे या आरोपीचे नाव असून त्याने सुसाईड नोट लिहीली आहे, त्यात त्याने महालक्ष्मीची हत्या केल्याचे कबुल केले आहे. ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील धुसुरी पोलिस स्टेशन परिसरात त्याचा मृतदेह आढळला आहे.
एका महिलेच्या हत्येचा तपास करण्यासाठी बेंगळुरू पोलिसांचे एक पथक नुकतेच येथे आले होते. मुख्य आरोपी हा भद्रक येथील रहिवासी असल्याचे पथकाने सांगितले. पथक आरोपीला पकडण्याआधीच त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे भद्रक जिल्ह्याचे एसपी वरुण गुंटुपल्ली यांनी सांगितले.
आईचा आरोप काय?महालक्ष्मीने आपल्या मुलाला जाळ्यात ओढले होते, असा आरोप केला आहे. ती त्याच्याकडे सारखे पैसे मागायची, असे मुलाने आपल्याला सांगितले होते. त्यावर मी त्याला नोकरी सोडून ती बंगळूरू का सोडत नाहीस असे विचारले होते. ती महिला त्याच्याकडे सारखे पैसे मागत असल्याने घाबरून त्याने हे कृत्य केले, असा दावा आरोपीची आई कुंजलता रे यांनी केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि महिला एका कपड्याच्या दुकानात काम करत होते. तिथेच त्यांच्याच मैत्री झाली होती. दोघांमध्ये प्रेमसंबंध देखील सुरु झाले होते. आधीच विवाहित असलेली महालक्ष्मी त्याच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होती. यावरून त्यांच्यात सतत वाद व्हायचे. त्या रात्री देखील झालेल्या वादातून आरोपीने महालक्ष्मीचा जीव घेतला व मृतदेहाचे तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवले होते.