बंगळुरूमध्ये एका इमारतीच्या प्लॅटमध्ये महालक्ष्मी नावाच्या महिलेची हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे महालक्ष्मीच्या मृतदेहाचे ५० तुकडे करण्यात आले. हे तुकडे फ्रिजमध्ये ठेवण्यात आले होते. घरातून दुर्गंधी येत असल्याचं समजल्यावर शेजाऱ्यांनी महालक्ष्मीच्या नातेवाईकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर तिची आई घरी पोहोचली. घरातील फ्रिज उघडल्यावर सर्वांना धक्काच बसला.
महालक्ष्मी हत्या प्रकरणाता आता खळबळजनक माहिती समोर आली आहे. "मी तिला मारलं नसतं तर तिने मला मारलं असतं" असं महालक्ष्मीचे ५० तुकडे करणाऱ्या व्यक्तीने त्याच्या सुसाईड नोटमध्ये म्हणत धक्कादायक दावा केला आहे. मुक्तिरंजन रॉय नावाच्या व्यक्तीने तिची हत्या केली. पोलिसांनी रॉयचे लोकेशन ट्रेस केले आणि तो ओडिशातील भद्रक येथे असल्याचं समजलं. मात्र पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
पोलिसांनी मुक्तिरंजनला पकडण्याआधीच त्याने आत्महत्या केली होती. त्याच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट सापडली होती, ज्यामध्ये महालक्ष्मीशी असलेल्या नात्याबद्दल धक्कादायक माहिती होती. त्यामध्ये त्याने महालक्ष्मीची हत्या केली, मृतदेहाचे वॉशरूममध्ये तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले, यानंतर तो ओडिशात पळून गेला हे मान्य केलं आहे.
सुसाईड नोटमध्ये मुक्तिरंजनने म्हटलं की, "महालक्ष्मीला त्याला मारायचं होतं आणि त्यासाठी तिने एक काळी सुटकेसही आणली होती. मला मारण्याचा तिचा हेतू होता. तसेच मृतदेहाचे तुकडे करून नंतर ते तिला सुटकेसमध्ये ठेवून फेकून द्यायचे होते. जर मी तिला मारलं नसतं तर तिने मला मारलं असतं आणि माझा मृतदेह फेकून दिला असता. मी स्वसंरक्षणासाठी तिला मारलं."
"महालक्ष्मीच्या मागण्या दिवसेंदिवस वाढत होत्या, मी तिला सोन्याची चेन आणि सात लाख रुपयेही दिले. तरीही ती मला मारहाणही करायची." त्रिपुराची रहिवासी असलेली महालक्ष्मी बंगळुरूमधील एका प्रसिद्ध मॉलमध्ये काम करायची. तपासादरम्यान, पोलिसांनी सांगितलं की, ती विवाहित होती आणि तिला एक मूल आहे पण ती पतीपासून वेगळी राहत होती.