नवी दिल्ली - आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी (Narendra Giri Death Case) यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खांबावर लटकलेला अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिसराला सील केला. तसेच घटनास्थळावरुन पोलिसांना 6-7 पानांची सुसाईड नोट मिळाली असून यात वादग्रस्त शिष्य आनंद गिरी यांचे नाव लिहिल्याचं स्पष्ट झालं आहे. नरेंद्र गिरी यांच्या सुसाईड नोटवरून त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडण्यात आल्याचं समोर येत आहे. तसेच त्यांना ब्लॅकमेल केलं गेलं होतं. नरेंद्र गिरी यांचे शिष्य आनंद गिरी यांनी "एका मुलीसोबत त्यांचा फोटो मॉर्फ्ड करून" त्यांना ब्लॅकमेल केल्याची माहिती आता समोर आली आहे.
महंत नरेंद्र गिरी यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये आपण आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. "आपल्या मृत्यूसाठी आनंद गिरी, अद्या प्रसाद तिवारी आणि त्यांचा मुलगा संदीप तिवारी हे जबाबदार आहेत. मी प्रयागराजच्या पोलीस अधिकाऱ्यांना विनंती करतो की, माझ्या आत्महत्येसाठी जबाबदार असलेल्या या लोकांवर कारवाई करा. तरच माझ्या आत्म्याला शांती मिळेल. मला कळलं की आनंद गिरी हे माझा एका मुलीसोबतचा मॉर्फ्ड फोटो व्हायरल करणार होते. आनंदने मला सांगितलं की एकदा हे पसरलं की, तुम्ही किती लोकांसमोर तुमचं निर्दोषत्व सिद्ध कराल?’ मी आतापर्यंत माझं आयुष्य सन्मानाने जगलो आहे आणि भविष्यात मी ज्या अपमानाला सामोरे जाईन त्यानंतर त्या आरोपांसह मी जगू शकत नाही" असं नरेंद्र गिरी यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.
"काही लोकांनी माझ्यावर आरोप करत मला अपमानित केले"
नरेंद्र गिरी यांनी 13 सप्टेंबर रोजी आत्महत्या करणार होतो पण हिंमतच झाली नाही असं म्हणत आपल्या सुसाईड नोटच्या प्रत्येक पानावर खाली आपलं नाव आणि सही देखील केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. मागील काही दिवसांपासून हनुमान मंदिरात मिळणाऱ्या देणग्यांवरुन महंत आणि या दोघांमध्ये वाद सुरू होता. महंत गिरी यांच्या मृत्यूची बातमी कळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहचले परंतु त्यांना मृतदेह खाली उतरवण्यात आला होता. महंतांच्या मृतदेहाशेजारी सुसाईड नोट आढळली. त्यासोबत सल्फासच्या गोळ्या सापडल्या. सुसाईड नोटमध्ये आनंद गिरी, अद्या तिवारी आणि त्यांचा मुलगा यांच्याविरोधात छळ केल्याचा आरोप आहे. संपूर्ण आयुष्यात कधीही अंगाला काळा डाग लागू दिला नाही. पण काही लोकांनी माझ्यावर आरोप करत मला अपमानित केले त्यामुळे महंत नरेंद्र गिरी खूप दु:खी होते.
शिवसेनेकडून सीबीआय तपासाची मागणी
महंत नरेंद्र गिरी बऱ्याच दिवसांपासून तणावाखाली होते, अशी माहिती मिळत आहे. नरेंद्र गिरी यांचे त्यांचे शिष्य आनंद गिरी यांच्याशी अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. त्यांनी आनंद गिरींना मठातून बाहेर केले होते. पण, त्यानंतर आनंद गिरी यांनी माफी मागितल्यानंतर वाद मिटला होता. पण, दोघांमध्ये काही कारणावरुन वाद सुरू होता, अशीही माहिती मिळत आहे. नरेंद्र गिरी हे मोठे महंत होते, कुंभमेळा असो, अयोध्येचं आंदोलन असो या सगळ्या हिंदुत्वाच्या लढाईत महंतजी पुढे असत. अनेकदा त्यांची आणि आमची भेट झाली आहे. त्यांचे आशीर्वाद हिंदुत्त्ववादी संघटना म्हणून शिवसेनेला अनेकदा मिळाले आहेत. ज्या पद्धतीने त्यांच्या मृत्यूचं प्रकरण समोर आलं ते रहस्यमय आहे. नरेंद्र गिरी महाराजांचा मृत्यू हा रहस्यमय असून या घटनेची सीबीआयमार्फत चौकशी करावी. कारण, ते मजबूत मनाचे होते, ते आत्महत्या करतील असे वाटत नाही, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.