उत्तर प्रदेशच्या महाराजगंज जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमध्ये एक वृद्ध महिला रडत रडत पोहोचली. साहेब, माझा मुलगा, सून आणि नातवाने केस पकडून मला घराबाहेर काढलं आहे, आता कुठे जाऊ? असा सवाल हतबल मातेने पोलिसांनाच विचारला. घटनेची माहिती मिळताच एसडीएम मुकेश कुमार सिंह आणि सत्यप्रकाश सिंह यांनी आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक घटनास्थळी पाठवले.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक आतिश कुमार सिंह यांनी पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारदारांच्या समस्या ऐकून घेत त्या तातडीने सोडवण्याता प्रयत्न केला. तर काही नंतर सोडवण्याचे संबंधितांना निर्देश दिले. याच दरम्यान एक वृद्ध महिला देखील तिची तक्रार घेऊन आली होती. पीडित वृद्ध महिलेच्या तक्रारीवरून एसडीएम आणि पोलिस स्टेशनने याची दखल घेत कारवाई करण्याचे आदेश दिले.
एसडीएमने महिलेवर अन्याय करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. नौतनवा पोलीस स्टेशन हद्दीतील बर्की कोहडवाल येथील रहिवासी असलेल्या कौलपाती यांनी तक्रारीत लिहिलं आहे की, ती तिच्या मुलापासून लांब दुसऱ्या घरी राहते. मात्र ते घर ताब्यात घेण्यासाठी तिचा मुलगा आणि सून अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होते.
शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास त्या खोलीत झोपल्या होत्या. अचानक त्यांचा मुलगा, सून आणि नातू घरात आले आणि केसाला धरून ओढत घराबाहेर काढलं. यानंतर कौलपाती यांनी मदतीसाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.