मुंबई - २००६ सालच्या प्रकरणातील पाहिजे आरोपींना अखेर महाराष्ट्र एटीएसनेअटक केली आहे. ही अटकमध्य प्रदेशातील बहानपुर आणि दिल्ली येथून केली असून आरोपींची नावे इजाज उर्फ अझीझ अक्रम शेख आणि इलियास अक्रम शेख अशी आहेत. बंदी असलेल्या सिमी (स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया) या दहशतवादी संघटनेचा अटक आरोपी सदस्य असल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली.
बेकायदेशीर कृत्य केल्याप्रकरणी ठाण्यात २००६ साली बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंध) अधिनियम-१९६७ अंतर्गत इजाजविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. २९ जुलै २००६ रोजी सिमी संघटने संबंधात नोंद झालेल्या गुन्हयात फरार असलेले इजाज अक्रम शेख आणि इलियास अक्रम शेख या बंधूंना गोपनिय माहितीवरून एटीएसने बहानपुर, मध्य प्रदेश आणि दिल्ली येथून अटक करण्यात आली आहे. ट्रान्झिट रिमांडवरून त्यांना मुंबईत आणण्यात येत असून पुढील तपास सुरु आहे.
सन २००१ पासून सिमी संघटनेवर बंदी घालण्यात आली होती. २००६ मध्ये दहशतवाद विरोधी पथकाला मिळालेल्या विश्वसनीय माहितीवरून नयानगर मिरारोड येथे धाड घातली असता एहतेशाम कुतुबुद्दीन सिध्दीकी याच्या घरी आक्षेपार्ह साहित्य मिळून आले होते. तसेच, या ठिकाणाहून बंदी घातलेल्या सिमी संघटना देशविरोधी काम चालू असल्याचे दिसून आले होते. यावरून दिनांक २९ जुलै २००६ रोजी त्यांच्याविरुद्ध बकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा (UAPA) अन्वये गुन्हा नोंद करुन त्याला अटक करण्यात आली होती.
सदर गुन्हयाच्या तपासात शासनाने बंदी घातली असताना सुध्दा संघटनेसाठी सक्रिय असलेले आरोपी निष्पन्न झालेले होते. त्यापैकी अब्दुस सुभान कुरेशी उर्फ तौकीर, सफदर नागौरी यांना यापूर्वीच अटक करून आरोपपत्र दाखल केले आहे. त्याचप्रमाणे त्यामध्ये इजाज शेख आणि इलियास शेख या बंधूंचा समावेश होता. ते सन २००६ पासून कुर्ला येथील राहत्या पाट्यावरून फरार होऊन ओळख लपवून वावरत होते. या गुन्हयातील मुख्य आरोपी एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्दीकी यास २४ ऑक्टोबर २०१६ साली ७ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा झाली आहे. त्याचप्रमाणे १६ जुलै २०१६ ला मुंबईत ७ ठिकाणी झालेल्या रेल्वे साखळी बॉम्बस्फोटातील गुन्ह्यात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.