Abdul Sattar: महाराष्ट्राचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Maharashtra Minister) यांच्या अडचणींना मोठा धक्का बसला आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिल्लोड न्यायालयाच्या तपासातून ही माहिती उघड झाली आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांनी यांनी 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) निवडणूक आयोगाला (Election Commission) खोटी माहिती दिली, असे तपासात उघड झाले.
नक्की प्रकरण काय?
अब्दुल सत्तार यांनी निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्रात चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती दिल्याचे सांगितले जात आहे. एकच जमीन 2014 च्या शपथपत्रात त्यांनी खरेदी केलेली दिसली. 2019 च्या प्रतिज्ञापत्रात त्याच जमिनीची अधिकची किंमत दाखवण्यात आली. अशा एकूण 4 ते 5 मालमत्तांच्या संदर्भात देण्यात आलेल्या माहितीमध्ये फरक असल्याचे न्यायालयाच्या तपासादरम्यान निदर्शनास आले. त्यामुळे सिल्लोड न्यायालयाने या प्रकरणी खटला चालवण्याचे आदेश दिले असून त्यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला.
आमदारकी जाण्याची शक्यता
सत्तार यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात मालमत्तेसंबंधी माहितीत फरक असल्याचे मान्य करत सिल्लोड न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध फौजदारी खटला चालवण्याचे आदेश बुधवारी दिले. हे आरोप सिद्ध झाल्यास अब्दुल सत्तार यांची आमदारकी जाईल, शिवाय 6 वर्ष निवडणूक लढण्यासही ते अपात्र ठरतील.
कोणी केली तक्रार?
या प्रकरणी सिल्लोड येथील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांनी 2021 मध्ये याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी तपास केला. तेव्हा ही माहिती समोर आली. महेश शंकरपल्ली आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी याबाबत 27 ऑक्टोबर 2021 रोजी याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने पोलिसांना या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. पण त्या तपासावर समाधान झाले नसल्याने शंकरपल्ली यांनी दोन वेळा न्यायालयात धाव घेतली. तिसऱ्यांदा न्यायालयाने मुद्देनिहाय तपासाचे आदेश दिले असता 11 जुलै रोजी न्यायाधीश मीनाक्षी धनराज यांनी सत्तारांविरुद्ध प्रथमदर्शनी पुरावे असल्याचे मान्य करत फौजदारी खटला चालवण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.