ठाणे : फेब्रुवारी 2003 मध्ये अमेरिकन मॉडेलच्या हत्येप्रकरणी गुजरातमधील एका व्यक्तीच्या प्रत्यार्पणासाठी महाराष्ट्रातील पोलीस पथक चेक प्रजासत्ताकमधील प्राग येथे गेले आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने सोमवारी दिली.
विशेष म्हणजे या खटल्यातील आरोपीच्या निर्दोष सुटकेला आव्हान देणाऱ्या अपीलवरील सुनावणीसाठी हजर न राहिल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने अमेरिकन नागरिक प्रणेश देसाई आणि सध्या प्रागमध्ये असलेला त्याचा मित्र विपुल पटेल यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यामुळे पटेलला पकडण्यासाठी पोलीस उपायुक्तांच्या नेतृत्वाखालील एक पथक शनिवारी प्रागला रवाना झाले, असे काशिमीरा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले.अमेरिकन मॉडेल लिओना स्विंदरस्की (३३) हिच्या हत्येप्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाने २००३ मध्ये दोघांची निर्दोष मुक्तता केली होती. देसाई आणि स्विंदरस्की हे रिलेशनशिपमध्ये होते आणि मे २००३ मध्ये लग्न करणार होते. ७ फेब्रुवारी २००३ रोजी, हे दोघे मुंबईतील विमानतळावर पोहोचल्यानंतर लगेचच, मॉडेल बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह दुसऱ्या दिवशी ठाणे जिल्ह्यातील काशिमीरा भागात महामार्गावर सापडला, असे अधिकाऱ्याने सांगितले.त्यानंतर पोलिसांनी असा आरोप केला की, देसाईने आपल्या मित्र पटेलची मदत घेऊन मॉडेलची हत्या करून तिच्या विमा रकमेचा दावा केला होता. विमानतळावर जेव्हा मॉडेल कॅबमध्ये बसली तेव्हा पटेलने मॉडेलला मारण्यासाठी दोन लोकांना भाड्याने घेतल्याचा आरोपही करण्यात आला. त्यानंतर मृतदेह महामार्गावर टाकण्यात आला.
देसाईला या वर्षाच्या सुरुवातीला गुजरातमधील वडोदरा येथून अटक करण्यात आली होती, तर पोलीस पटेलचा शोध घेत होते आणि इंटरपोलने नंतर त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस देखील जारी केली होती, असे अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांनी परराष्ट्र मंत्रालय आणि इंटरपोलशी समन्वय साधला आणि नंतर आरोपीला पकडण्यासाठी प्रागला रवाना झाले. ते या आठवड्याच्या शेवटी परत येण्याची शक्यता आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.