पणजीः महाराष्ट्रपोलिसांना हवा असलेला आणि 33 गुन्हे ज्याच्यावर नोंद झाले आहेत असा जहाल अट्टल गुन्हेगार विकी ऊर्फ विक्रांत देशमुख याला पणजी पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा पाठलाग करून पकडले. त्याला महाराष्ट्र पोलिसांकडून मोक्का लावण्यात आला होता. त्याच्याकडे पिस्तुल आणि 5 जिवंत राऊंड्स सापडले महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाईझ्ड क्राईम (मोक्का) खाली ज्याच्यावर महाराष्ट्रात गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. असा हा विकी शनिवारी रात्री पणजी येथील एका कँसिनोवर असल्याची माहिती पणजी पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी नियोजित सापळा रचून त्याला गाठले. त्याला पकडण्यासाठी पोलीस पथक सरसावले असता त्याने पळण्याचा प्रयत्न केला. तो पळतही सुटला परंतु पणजी पोलिसांनी त्याचा पाठलाग केला व त्याला गाठले अशी माहिती उत्तर गोव्याचे अधीक्षक शोभित सक्सेना यांनी दिली. काही दिवसांपूर्वी नवी मुंबई पोलीसस्थानकातून गोवा पोलिसांना विकीच्या गोव्यातील वास्तव्याविषयी माहिती देण्यात आली होती. त्यासाठी निरीक्षक विजयसिंग भोसले यांच्या नेतृत्वाखाली मुंबई पोलीसांचे एक पथकही पणजीत दाखल झाले होते. परंतु तो नेमका कुठे आहे याचा पत्ता मिळविण्याचे काम पणजी पोलिसांनी केले. तो पणजीतील एका कँसिनोत असल्याची माहिती मिळाल्यावर पणजी पोलीस व महारष्ट्र पोलीसांच्या संयुक्त पथकाने ही धडक कारवाई केली. दोन दिवसांपूर्वीच आला होता गोव्यात मुंबई पोलिसांपासून बचाव करीत मागील 5 वर्षे विकी फिरत होता. गोव्यातही तो त्यासाठीच आला असल्याचा पोलिसांचा तर्क आहे. परंतु काही मनोरंजनात्मक कार्यक्रमासाठी तो आला असल्याचे तो आता पोलिसांना सांगत आहे. दोन दिवसांपूर्वीच तो गोव्यात आला होता आणि कळंगूट येथे तो राहिला होता. ह्या पोलिसाने पकडले अट्टल गुन्हेगार विकी ऊर्फ विक्रांत हा तसा सशक्त आणि मजबूत शरीरयष्टीचा माणूस. तो निसटून पळायला लागला तेव्हा त्याच्यापेक्षा जलदगतीने पळून पकडून ठेवण्याचे धाडस पणजी पोलीस स्थानकातील मनोज पेडणेकर या कॉन्स्टेबलने केले. अधिक्षक शोभित सक्सेना यांनी त्याचे या धाडसाबद्दल कौतुक केले.
त्याचा साथिदारही गोव्यात?
विकी हा गोव्यात एकटा नसून त्याचा साथिदारही त्याच्याबरोबर आहे असा पोलिसांना दाट संशय आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी यंत्रणे सतर्क केली आहेत. त्याचे गोव्यात येण्याचे नेमके कारण जरी निश्चित झालेले नसले तरी सर्व शक्यता पडताळल्या जातील. गोव्यात काही घातपात करण्यासाठी तो आला होता का याचीही पडताळणी होत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.