नरेश डोंगरे
नागपूर : गर्भश्रीमंत आणि लब्धप्रतिष्ठीतांना आमिष तसेच धाक दाखवून कोट्यवधींच्या रकमेवर डल्ला मारणारा महाठग अजित पारसे याने येथील एका खाद्य विक्रेत्याला दिल्लीत पॉश हाटेलसाठी जागा मिळवून देण्याच्या नावाखाली 'कोटींची' टोपी घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, कमालीची 'हिशेबी' असलेल्या या खाद्य विक्रेत्याने महाठग पारसेची डाळ शिजू दिली नाही. महाठग पारसेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्या फसवणूकीचे अनेक प्रकरणं चर्चेला आले आहे. त्यातीलच एका प्रकरणाचा हा किस्सा आहे.
फ्री अॅक्सेस असलेला पारसे सतत दिल्लीच्या चकरा मारायचा. यातून त्याने आपले सीबीआय, ईडीसह पंतप्रधान कार्यालयातही कसे वजन आहे, याचे मृगजळ निर्माण केले. ही भपकेबाजी पाहून पारसेच्या प्रेमात बुडालेले अनेक जण हवेत स्वप्नाचे महाल बांधत होते. येथील एका खाद्य विक्रेत्यानेही पारसेसोबत घसट वाढली. पारसेने खाद्य विक्रेत्यासमोर स्वादिष्ट स्वप्नाचे ताट वाढले. प्रारंभी पाच-पन्नास लाख खर्च केल्यास पीएमओतून दिल्लीत जागा मिळवून घेता येईल आणि तेथे शानदार हॉटेल बांधता येईल, असे पारसे म्हणाला. महाराज हुरळले आणि त्यांनी पारसेच्या प्रस्तावावर खिचडी शिजविण्याची तयारी दाखवली. मात्र, हिशेबी स्वभावानुसार आपल्या संबंधाचा वापर करत त्यांनी दिल्लीतील प्रस्थांशी निगडित असलेल्यांकडे पारसेच्या प्रस्तावावर चर्चा केली. आमिषाचे खमंग ताट दाखवणारा पारसे ताटात माती टाकण्याच्या तयारीत असल्याचे त्यातून स्पष्ट झाले आणि नंतर महाराजांनी पारसेच्या भावनांवर पाणी ओतले.
पारसेंची उडाणे, लाखो-करोडोंचीच
पारसेने ज्यांना ज्यांना टोपी घालण्याचा प्रयत्न केला किंवा ज्यांना ज्यांना त्याने चुणा लावला, ते सर्व लाखो-करोडोतच आहे. तो ज्यांना कुणाला आमिष द्यायचा ते लाखो, करोडोंचेच असायचे. पोलिसांकडे पोहचली नसली तरी अशी अनेक प्रकरणं आता जोरदार चर्चेचा विषय बनली आहेत.