मुंबई - मनसे पदाधिकारी महेंद्र भानुशाली यांच्या चांदिवलीतील कार्यालयातून पोलिसांनी भोंगे जप्त केले. तसेच घाटकोपर पोलिसांनी भानुशाली यांनाताब्यात घेतले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. राज ठाकरे यांनी आवाहन केल्यानंतर भानुशाली यांनी हनुमान चालीसा लावली होती.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवा नाहीतर मशिदींसमोर दुप्पट लाउडस्पीकर लावून हनुमान चालीसा लावू असा इशारा पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणात दिला होता. राज ठाकरेंच्या भाषणाच्या दुसऱ्याच दिवशी याचे पडसाद पाहायला मिळाले होते. मुंबईतील चांदीवली येथे मनसेच्या कार्यालयावर कार्यकर्त्यांनी भोंगे लावून त्यावर हनुमान चालीसा लावली होती. चांदीवली विधानसभा मतदार संघातील विभाग अध्यक्ष मेहेंद्र भानुशाली यांनी पक्ष कार्यालयावर भोंगे लावून मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावली होती. चिरागनगर पोलिसांनी याबाबत भानुशाली यांना अगोदर समज दिली. पण त्यानंतरही भोंगे न उतरवल्यामुळे पोलिसांनी भानुशाली यांना ताब्यात घेतलं होतं असून भोंगे देखील खाली उतरवले.