मुंबई: घर कामासाठी ठेवलेल्या मोलकरणीने एका वृद्ध व्यक्तीच्या घरातून लाखो रुपयांचे दागिने लंपास केले होते. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसानी गुन्हा दाखल करत तिला अटक करू चोरलेली शंभर टक्के मालमत्ता हस्तगत केली.
विलेपार्ले पूर्वच्या न्यू मेक हाईटस्मध्ये व्यवसायिक जयकृष्ण पाठक (६२) राहतात. त्यांच्याकडे करीना कारकर (२१) ही मुळची रत्नागिरीची तरुणी घरकाम करत होती. दरम्यान ३० डिसेंबर रोजी पाठक हे संध्याकाळी ५ वाजता नेहमीप्रमाणे कामावरून घरी आले. बाहेर जायचे असल्याने ते बेडरूममधील कपाटात ठेवलेली दोन सोन्याची चैन काढायला गेले मात्र त्या त्यांना सापडल्या नाहीत. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी त्या ३० डिसेंबरला उशीरा रात्री कपाटामध्ये ठेवल्या होत्या, मात्र घरभर शोधाशोध करून देखील त्यांना ती सापडली नाहीत. त्यावेळी करीनाने ती घेतली असेल अशी शंका त्यांना आली आणि त्यांनी तिच्याकडे विचारणा केली. त्यावर तिने त्यांना उडवाउडवीचे उत्तर दिले व बघा माझी बॅग चेक करा मी चैन घेतल्या नाहीत असे सांगितले.
तसेच दोन तासाने घरातील कामे उरकून दिवा येथे जात असल्याचे सांगून निघून गेली. अखेर या प्रकरणी पाठक यांनी करीना विरोधात विलेपार्ले पोलिसात धाव घेतली. परिमंडळ ८ चे पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेणुका बुवा आणि पथकाने दिवा परिसरातून करीनाला तिच्या बहिणीच्या घरातून ताब्यात घेतले. तसेच तिने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर अटक करत चोरलेल्या दोन्ही चैनही हस्तगत केल्या.