मुंबई : मालकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत घरातील अल्पवयीन मोलकरणीनेच साडेसतरा लाख किमतीच्या हिरेजडित दागिन्यांवर हात साफ केल्याची घटना मलबार हिल येथे उघडकीस आली. व्यावसायिकाच्या तक्रारीवरून मोलकरणीविरुद्ध गुन्हा दाखल करीत, तिच्याकडे चोरी केलेल्या दागिन्यांबाबत अधिक तपास सुरू आहे.नेपियन्सी रोड परिसरात राहणारे आशिष अग्रवाल (४२) यांच्या घरात ही चोरी झाली. त्यांचा ड्रायफ्रुट विक्रीचा व्यवसाय आहे. मुलीच्या देखभालीसाठी त्यांनी घरकाम करणाऱ्या नोकर महिलेच्या १७ वर्षीय चुलत बहिणीला ९ फेब्रुवारीपासून नोकरीवर ठेवले. ती तेथेच राहत होती. राजस्थानला लग्न असल्याने १० मार्च रोजी अग्रवाल यांनी बेडरूममधील कपाटात ठेवलेले दागिने तपासले. त्यात, हिरेजडित कर्णफुलांची एक जोडी गायब असल्याचे दिसून आले. मात्र लग्नाची घाई असल्याने त्यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले. पुढे, १२ मार्च रोजी घरी आल्यानंतर पुन्हा एकदा दागिने तपासले तेव्हा त्यात काही दागिने गायब असल्याचे दिसले. १३ मार्च रोजी त्यांनी घरातील अन्य सदस्यांनाही दागिने तपासण्यास सांगितले. तेव्हा आईचेही दागिने मिळून आले नाही. यात, साडेसतरा लाखांचे दागिने गायब होते.घरातील सर्व नोकरांकडे याबाबत चौकशी केली. मात्र सर्वांनी याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले. याच दरम्यान सोसायटीत येणाºया अनोळखी लोकांची यादी माय गेट या अॅपमध्ये जतन करण्यात येते. त्यातील माहितीनुसार, सोसायटीत अनोळखी व्यक्ती आली नसल्याचे समजले. त्यामुळे नोकरांपैकीच कोणीतरी ही चोरी केल्याचा संशय त्यांना आला. अल्पवयीन नोकर मुलीच्या संशयास्पद हालचाली त्यांनी हेरल्या. तिच्याकडे उलटतपासणी सुरू करताच तिने चोरी केल्याची कबुली दिली.यात ९ फेब्रुवारी ते १२ मार्चदरम्यान अल्पवयीन मोलकरणीने तब्बल १७ लाख ५० हजार रुपयांच्या दागिन्यांवर हात साफ केला होता. या प्रकरणी अग्रवाल यांच्या तक्रारीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साडेसतरा लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीनेच मारला डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 3:11 AM