मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका फोटोमुळे 50 लाखांचे दागिने आणि 5 लाख रुपयांची चोरी उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. महिन्याला आठ हजार रुपयांवर काम करणाऱ्या महिलेच्या घरात एसीपासून सर्व सुविधा असल्याचे पोलिसांना आढळून आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.
टीटी नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी चैन सिंह रघुवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, टीटी नगर पोलीस स्टेशन परिसरातील निशात कॉलनीत राहणारे डॉ. भूपेंद्र श्रीवास्तव यांनी घरातून मौल्यवान दागिने चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. शहाजहानाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत भूपेंद्र यांचे खासगी रुग्णालय आहे.
भूपेंद्र यांनी गेल्या काही वर्षांत त्यांच्या घरातून हळूहळू मौल्यवान दागिने आणि रुपये चोरीला जात आहेत. चोरीच्या संशयावरून आम्ही 20 दिवसांपूर्वी मोलकरणीला नोकरीवरून काढून टाकलं पण पत्नीकडे मोलकरणीचा WhatsApp नंबर आहे अशी माहिती पोलिसांना दिली.
बायकोने मोलकरणीचा डीपी पाहिला तेव्हा मोलकरणीने स्पेशल कानातले घातलेले दिसले. माझ्या पत्नीकडेही असेच कानातले होते. माझ्या पत्नीला संशय आल्याने तिने लॉकर उघडून पाहिले. तर त्यात ठेवलेले कानातले गायब होते. मोलकरणीने घरातील दागिने चोरले असावेत, असा आम्हाला संशय होता.
पोलिसांनी मोलकरणीला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली, त्यानंतर तिने डॉक्टरांच्या घरात चोरी केल्याचे मान्य केले. पोलिसांनी आरोपी महिलेकडून बांगड्या, टॉप्स, नेकलेस, आणि सोन्याच्या बांगड्यांसह 50 लाख रुपयांचे दागिने जप्त केले आहेत. यासोबतच साडेपाच लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
पोलिस चौकशीत आरोपी महिलेने सांगितले की, डॉ. भूपेंद्र कुटुंबासह घराबाहेर असताना ती घरात चोरी करायची. तसेच तिला कोणत्याही फंक्शनला जायचे असेल तर ती मालकिणीचे दागिने घालायची. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेला डॉक्टरांच्या घरी काम करण्यासाठी 8 हजार रुपये पगार मिळत होता. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.