माजलगाव (बीड) – महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार प्रकरणात पोलिस कोठडीत असलेल्या एका आरोपीने विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आज सकाळी ११ वाजता माजलगाव पोलीस स्थानकात ही घटना घडली.
शहरातील एका महाविद्यालयातील अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. यातील मुख्य आरोपी आशिष बोरासह मनोज फुलवरे व एका युवतीला रविवारी ( दि. १९) दुपारी अटक करण्यात आली. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार होते. मात्र आज सकाळी मनोज फुलवरे याने कोठडीत विषारी द्रव्य पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला तत्काळ शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे त्याचावर प्राथमिक उपचार करण्यात आले.