अमरावती : दहशतवादी विरोधी पथक (एटीएस) ने फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील मासोद येथे १२०० ते १५०० जिलेटिनच्या कांड्या जप्त केल्या. स्फोटक पदार्थांचा हा साठा तीन वाहनांमध्ये भरून होता. पथकाने सोमवारी दुपारी १२ ते १ च्या सुमारास गोपनीय माहितीवरून ही कारवाई केली. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणीची कसून चौकशी सुरू होती.
सदर वाहने ही पोलीस आयुक्तालय परिसरातील जोग स्टेडियममध्ये ठेवण्यात आली आहेत. जिलेटिन कांड्यांची ही खेप अकोल्यावरून आली आहे. विहीर व खदानाकरिता सदर जिलेटिनचा वापर करण्यात येतो. मात्र, सदर जिलेटिन हे कुठून आणण्यात आले, ते अधिकृत आहेत काय, हा साठा कुणाच्या मालकीचा, याची चौकशी एटीएसचे अधिकारी करीत आहेत. याप्रकरणी तीन वाहनचालकांना पथकाने ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. सदर वाहन चालकांकडे जिलेटिन कुणाचे आहे, यासंदर्भातील स्पष्टता सांगणारी कुठलीही अधिकृत कागदपत्रे वाहन चालकांकडे आढळून आले नाही. त्यांच्याकडे वाहतुकीचा परवाना नसल्याने सदर वाहने जप्त केली आहेत व चौकशी सुरू करण्यात आली आहे, असे पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी सांगितले. काही आठवड्यांपूर्वी तिवसा तालुक्यातील मोझरी येथे मोठ्या प्रमाणात जिलेटिन कांड्या जप्त करण्यात आल्या होत्या, हे विशेष!
एटीएसच्या पथकाने सदर कारवाई केली. त्या तीन वाहनांत १२०० ते १५०० जिलेटिन कांड्या असण्याची शक्यता आहे. त्यांची मोजणी सुरू आहे. त्या कुठून व कशासाठी आणल्या, त्याची कसून चौकशी सुरू आहे. - आरती सिंह, पोलीस आयुक्त
या क्रमांकाची वाहने जप्त
एमएच ३० एल ४९९५, एमएच ३० एबी ४२५३, एमएच ३० एबी २६५२ क्रमांकाच्या वाहनातून सदर स्फोटके (जिलेटिन कांड्या) ची वाहतूक करण्यात आली. ती पथकाने जप्त केली आहेत.