मुंबई - बनावट टीआरपी रेटिंगद्वारे कोट्यवधीच्या जाहिराती मिळवून नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. रिपब्लिक चॅनेच्या सीईओला अटक करण्यात आली असून आतापर्यंत या प्रकरणात 13 लोकांना अटक करण्यात आलेली आहे.
रिपब्लिक चॅनेलचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक झाली आहे. टीआरपी घोटाळ्याप्रकरणी विकास खानचंदानी यांची याआधी चौकशीही करण्यात आली होती. बनावट टीआरपी रँकिंग मिळवून त्याच्या आधारे जाहिराती मिळविण्यासाठी वृत्तवाहिन्याना मदत करणाऱ्या रॅकेटचा मुंबईपोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याबाबत रिपब्लिकनसह अन्य दोन लहान टीव्ही चॅनेलवरही गुन्हा दाखल केला आहे. ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिलच्या (बीएआरसी) तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी हे रॅकेट उघडकीस आणले आहे.
पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न उलटविला'रिपब्लिक' च्या मुख्य वित्तीय अधिकारी शिव सुंदरम यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील रिटवर सुनावणी होईपर्यंत कोणालाही चौकशीला बोलवू नये, असे सांगत एकप्रकारे पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याला बळी न पडता इतरांना समन्स बजावित तातडीने चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये ऑक्टोबरमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानी, कार्यकारी अधिकारी हर्ष भंडारी व प्रिया मुखर्जी यांना समन्स बजावण्यात आले होते.
टीआरपी प्रणालीकडे लक्ष देण्यासाठी समितीकेंद्र सरकारने टीआरपी प्रणालीवर लक्ष देण्यासाठी नव्या समितीची नियुक्ती केली आहे. प्रसारभारतीचे सीईओ शशी शंकर वेम्पती यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यांची ही समिती सध्या अस्तित्वात असलेल्या टीआरपी यंत्रणेचा अभ्यास करून विश्वासार्ह आणि पारदर्शी यंत्रणा उभारण्यासंदर्भातील शिफारशी करेल. मात्र, केंद्राने नेमलेल्या या समितीला न्यूज ब्रॉडकास्टर्स फेडरेशनने (एनबीएफ) आक्षेप घेतला आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेने टीआरपीची अचूक मोजणी शक्य; आयटी तज्ज्ञांचा दावादूरचित्रवाहिन्यांना नेमका किती प्रेक्षकवर्ग लाभतो याची माहिती मिळविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे क्यू आर कोड तयार करता येतात. ते प्रेक्षकांना स्कॅन करून घेण्यास सांगावे. त्याद्वारे मिळणाऱ्या प्रतिसादावरून एखाद्या कार्यक्रमाला किती प्रेक्षकवर्ग लाभला याची संख्या कळू शकते. बनावट क्यू आर कोड शोधण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सद्वारे सतत तपासणी करत राहिल्यास या प्रक्रियेतील घोटाळे सहज पकडता येतील, असेही आयटी तज्ज्ञांनी म्हटले आहे. कोणते कार्यक्रम किती वेळ, किती लोकांनी पाहिले याची माहिती डीटीएच आॅपरेटरकडे असते. ती मिळवून त्याचे विश्लेषण केल्यासही आपल्याला प्रेक्षकसंख्या व इतर बाबींची उत्तरे मिळू शकतील. या सर्व बाबी बारकाईने तपासण्यासाठी सोय असल्याने त्या प्रक्रियेची विश्वासार्हताही अबाधित राहू शकते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपल्याला कोरोना रुग्णांची संख्या व त्या साथीचा फैलाव याचीही अचूक माहिती मिळू शकते. एखाद्या भूभागात जंगलाचे क्षेत्र विस्तारते की आक्रसते आहे, याचाही अचूक तपशील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून जीपीएस यंत्रणेच्या साहाय्याने मिळविता येतो. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने भविष्यात जगातील आणखी व्यवहार पार पडणार आहेत. त्यामुळे प्रत्येक देशाला दैनंदिन व्यवहारातही या तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा लागणार आहे, असे आयटीतज्ज्ञांनी म्हटले आहे.