पुणे शहरातील वानवडी परिसरात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) मोठी कारवाई केली आहे. ‘ISIS’ या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून एनआयएने एका घरावर छापेमारी केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली असून काही कागदपत्रं आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या आहेत.
गेल्या तीन दिवसांपासून एनआयएचे पथक पुण्यात तपास करत असून अटक केलेल्या आरोपीची कसून चौकशी केली जात आहे. संबंधित चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे उघड होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे. तल्हा लियाकत खान असं अटक केलेल्या 38 वर्षीय संशयित आरोपीचं नाव असून तो पुण्यातील वानवडी परिसरात वास्तव्याला होता. आरोपी तल्हा खानचे दहशतवादी संघटना इसिसशी संबंध असल्याची गुप्त माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी आरोपी तल्हा खान याच्या वानवडी येथील घरावर छापेमारी केली. NIA च्या पथकाने तल्हा खान याला अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.
वानवडी परिसरात तल्हा लियाकत खान (वय ३८) वास्तव्यास आहे. इसिसशी संबंध असल्याचा संशयावरून एनआयएच्या पथकाने खान याच्या घरावर छापा टाकून कारवाई केली. खान याच्या घरातून कागदपत्रे आणि इलेक्ट्राॅनिक्स वस्तू जप्त करण्यात आल्या असून, या प्रकरणात खान याची चौकशी सुरू असल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली. ‘इसिस’शी संबंध असल्याचा संशय तसेच देशभरात घातपात कारवायाच्या तयारीत असल्याच्या संशयावरून दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने (स्पेशल सेल) ८ मार्च २०२० रोजी दिल्लीतून जैनब सामी वाणी आणि त्याची पत्नी हिना बशीर बेग (रा. जामीयानगर, दिल्ली) या काश्मिरी दाम्पत्याला अटक केली हाेती. हा गुन्हा एनआयएकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला. त्यांच्या चौकशीत चौघा जणांची नावे निष्पन्न झाली होती.