नवी मुंबई : स्वत:ला कोरोना झाल्याने जीवन संपवत असल्याचे पत्नीला सांगून प्रेयसीसोबत संसार थाटलेल्या व्यक्तीचा वाशी पोलिसांनी शोध घेतला आहे. दोन महिन्यांनी या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. त्याने पत्नी व मुलीला सोडून पे्रयसीसोबत मध्य प्रदेशच्या इंदोरमध्ये संसार थाटला होता.मनीष मिश्रा (२८) असे वाशी पोलिसांनी ताब्यात घेऊन कुटुंबीयांच्या स्वाधीन केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो जेएनपीटी परिसरात खासगी कंपनीचा कामगार आहे. २४ जुलै रोजी तो नेहमीप्रमाणे मोटरसायकलवरून कामाला गेला होता. परंतु काही वेळाने त्याने पत्नीला फोन करून त्याला कोरोना झाला असून, जास्त दिवस जगणार नसल्याचे सांगितले. यामुळे आपण जीवन संपवत असल्याचे त्यांनी पत्नीला फोनवरून सांगितले होते.मात्र यानंतर त्याने फोन बंद करून ठेवला होता. दरम्यान त्याच्या नातेवाइकांनी शोधाशोध सुरू केली असता वाशी सेक्टर १७ परिसरात त्याची मोटरसायकल आढळली. यावरून वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.या घटनेमागे घातपाताची शक्यता आहे का? या अनुषंगाने वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजीव धुमाळ यांनी तपासाला सुरुवात केली होती. शोधाशोध सुरू असताना ऐरोलीमधून तो एका महिलेसोबत कारमधून गेला असल्याचे समोर आले. त्यानुसार त्याला कार पुरवणाऱ्या कंपनीचा शोध घेतला असता, तो मध्य प्रदेशमधील इंदोर येथे गेल्याचे उघड झाले.भाड्याने घेतलेल्या कारमुळे उलगडाकोरोना झालेल्या व्यक्तीपासून इतरांना संसर्ग पसरू शकतो. यामुळे कोरोना झालेल्या व्यक्तीला कुटुंबही डावलत असल्याचे दिसून आले आहे. कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जात नव्हता. याचाच आधार घेत त्याने पत्नी व मुलीपासून सुटका मिळवण्यासाठी स्वत:ला कोरोना झाल्याने जीवन संपवत असल्याचा बनाव केला होता. परंतु सीसीटीव्ही तसेच भाड्याने घेतलेल्या कारमुळे या प्रकरणाचा उलगडा झाला.
प्रेयसीसोबत संसारासाठी चक्क कोरोनाचा केला बनाव , इंदोरमधून पती ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 1:52 AM