मुंबई - हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांच्याशी वैयक्तिक ओळख असल्याचं सांगून अनेकांना रेल्वेत नोकरीच आमिषं दाखवून लाखोंचा गंडा घाणाऱ्या एका भामट्याला खार पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यापूर्वी देखील अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या मुलाचे नावे बोगस फेसबुक अकाउंट बनवून फसवणूक करण्यात आली होती. आरोपीने सुरेश प्रभूरेल्वे मंत्री असल्यापासून अशा प्रकारे बेरोजगार तरुणांना गंडा घालण्यास सुरुवात केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
विश्वनाथ गुरव (२५) या नालासोपारा येथे राहणाऱ्या तरुणासह अनेकांना आरोपी जितेंद्र घाडी याने बोगस बतावणी करून लाखोंचा गंडा घातला आहे. जितेंद्रने मुंबई सेंट्रल पश्चिम येथील रेल्वे कार शेडमध्ये ऑफिस बॉय असल्याची बतावणी करून तसेच भाजपा नेते सुरेश प्रभू यांच्याशी त्याची वैयक्तिक ओळख असल्याचे भासवून सुरेश प्रभू फॅन क्लब या नावाने व्हॅट्स अॅप ग्रुप तयार केला. या ग्रुपमध्ये फसवणूक केलेल्या तरुणांना आरोपी जितेंद्रने अॅड केले होते. तक्रारदार गुरव यांना आरोपीने मुंबई सेंट्रल येथे टीसी या पदाच्या नोकरीचे पात्र देऊन मेकॅनिकल इंजिनियरच्या नोकरीचे आमिष दाखविले. तसेच त्याने गुरव यांना मुंबई सेंट्रल, पश्चिम रेल्वे यांचा लोगो आणि शिक्का असलेले प्रतिकृती अधिकारी यांची सही असलेले बोगस नेमणुक पत्र आणि टीसीचा गणवेश दिला. अशा प्रकारे गुरव यांची जितेंद्रने फसवणूक केली. त्याचप्रमाणे व्हॅट्स अॅप ग्रुपमधील इतर सदस्यांकडून १ लाख ९० हजार घेऊन फसवणूक केल्याचे देखील उघडकीस आले. त्यानंतर खार पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ४१९, ४२०, ४६५, ४६६, ४६८, ४७३ सह माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांच्या पथकाने तपास सुरु करून आरोपी जितेंद्र घाडीला मालाड पूर्वेकडील त्रिवेणी नगर येथून अटक केली. आरोपी घाडीला न्यायालयाने १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून अजून किती जणांना घाडीने गंडा घातला आहे याचा तपास पोलीस करणार आहेत.