मुंबई - महिलांचे अश्लील फोटो बनवून ते सोशल मीडियावर वायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखेच्या कक्ष - ९ अटक केली आहे. सिध्दार्थ सरोदे असं अटक आरोपीचं नाव आहे.
वर्सोवा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीने पीडित महिलेशी व्हॉटस अॅपवर चॅट करून तिचा चेहरा आणि दुसऱ्या नग्न महिलेचे शरीर असलेला एक पुरूषासोबतचा अश्लील फोटो मॉर्फ करून इंग्रजीत महिलेचे नाव आणि कॉलगर्ल असे लिहिलेला पीडित महिलेला पाठविले. हा फोटो सोशल मीडियावर वायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने पीडित महिलेकडे १ लाख रुपयांची मागणी केली होती. नेहमीच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीचा मोबाईल वोळोवेळी तपासादरम्यान बंद आढळून येत होता. तरीदेखील कक्ष ९ चे पोलीस शिपाई प्रफ्फुल पाटील आणि महिला पोलीस शिपाई पुजारी यांनी आरोपीच्या मोबाईलवरून सविस्तर तपास करून गुप्त बातमीदाराच्या मदतीने आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या आरोपीने किमान ७ महिलांना सोशल मीडियावर गाठून अशा प्रकारे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी सिद्धार्थ महिलांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग डायरेक्टर असल्याचे खोटे सांगून त्यांचे फोटो मिळवून ते पिक्सआर्ट या गुगल अॅपच्या मदतीने अश्लील फोटो तयार करत असे.