जळगाव : आठ वर्षांपूर्वी शाळेत असतानाच्या वेळी मार्फिंग केलेले विवस्त्र फोटो तसेच आईसह तरुणीचे अश्लील व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले व यासंबंधाचे मित्राला फोटो काढायला लावून तरुणीला ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित तरुणीने पोलीस अधीक्षकांकडे आपबिती कथन केल्यानंतर याप्रकरणी तत्काळ सूत्रे हलली व गुन्हा दाखल होऊन चौघांना अटकही झाली.
याबाबत पोलीस जळगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, पीडित तरुणी व रितेश सुनील बाविस्कर (रा. भुसावळ) यांची २०१४ पासून ओळख आहे. पीडिता भुसावळात शिक्षण घेत असताना कधी तरी शालेय कार्यक्रमात तिचे व मैत्रिणीचे फोटो रितेशकडे होते. या फोटोत मार्फिंग करून त्याने दोघींचे निकेड फोटो व व्हिडिओ तयार केले. सध्या पीडिता महाविद्यालयीन शिक्षण घेत असून, महाविद्यालयाजवळच तिला भेटून हे फोटो दाखविले व मी सांगेन तसे कर, नाहीतर हे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकाराने घाबरलेली पीडिता रडायला लागली. त्याने जबरदस्तीने तरुणीला दुचाकीवर बसविले, याच दुचाकीवर बंटी व राहुल या त्याच्या दोघा मित्रांनाही भुसावळातील इंजिनघाट परिसरात नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध केले व मित्रांना त्याचे फोटो काढायला लावले. यावेळी तरुणीजवळील दोनशे रुपये व बोटातील सोन्याची अंगठी काढून घेत पुन्हा शाळेजवळ सोडून दिले. हा प्रकार कोणाला सांगितला तर फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.
व्हिडिओ वेबसाइटवर अपलोड केले
या घटनेनंतरही रितेश याचा मित्र उर्वेश पाटील हा तरुणीवर नजर ठेवून असायचा. शाळा सुटण्याआधी सायकल पंक्चर करून ठेवायचा, जेणेकरून पीडिता इतर मैत्रिणींसोबत राहू नये असा त्यामागील उद्देश होता. यानंतर रितेश जबरदस्तीने त्याच्या घरी नेऊन पीडितेवर अत्याचार करायचा. यावेळी त्याचेही व्हिडिओ तयार केले. उर्वेश व रितेशची आई शोभा बाविस्कर यांनी हे फोटो व व्हिडिओ अश्लील वेबसाईटवर अपलोडही केले. यानंतरही ब्लॅकमेलिंग सुरूच राहिली. रितेश याच्या बहिणीच्या लग्नासाठी पीडितेच्या गळ्यातील सात ग्रॅमची सोनसाखळी काढून घेत त्याच्या बहिणीच्या गळ्यात घातली. त्यानंतर लग्नासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली. पीडितेने घाबरून शिक्षणाच्या नावाने वडील व भावाकडून पैसे घेऊन रितेशला दिले.