लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली: सध्या रील्स बनविण्याची मोठी क्रेझ असताना एका बांधकाम व्यासायिकाच्या रील्स बनविणे चांगलेच महागात पडले आहे. काही कामानिमित्त मानपाडा पोलीस ठाण्यात गेलेल्या या व्यवसायिकाने चकक पोलिस अधिका-यांच्या खुर्चीवर बसूनच रील्स बनवले. त्यानंतर अन्य ठिकाणी बंदूक घेऊन मित्रांसोबत डान्स करत संबंधित व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केले. मानपाडा पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करीत त्याला बेडया ठोकल्या आहेत. सुरेंद्र पांडुरंग पाटील उर्फ चौधरी असे त्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे.
पाटील हा ठाकुर्ली चोळेगाव परिसरात राहतो. पाटील याला एका भोंदू बाबाने पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत तब्बल ५६ लाखांना गंडा घातला होता. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत कथित तांत्रिक बाबासह त्याच्या साथीदारांना अटक करत सुमारे १९ लाख ६६ हजार रुपये रक्कम हस्तगत केली होती. ही रक्कम त्या गुन्हयातील तक्रारदार सुरेंद्र पाटील याला परत करण्यासाठी पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात बोलवले होते. सुरेंद्र हा दिवाळीत मानपाडा पोलीस ठाण्यात गेला होता. पोलीस अधिकारी श्रीकृष्ण गोरे यांनी सुरेंद्र याला त्यांच्या दालनात थांबवून ते मुद्देमाल आणण्यासाठी अन्य दालनात गेले. दालनात कोणीही नाही याचा फायदा उठवित पाटील याने गोरे यांच्या खुर्चीवर बसून स्वत: चे रील्स बनविले. हा व्हिडीओ त्याने सोशल मिडीयावर व्हायरल केला. त्यानंतर भिंवडी अंजूरफाटा, पडघा याठिकाणी मित्रंसमवेत पार्टी करताना त्याने त्याचे बंदूक हातात घेऊन मित्रंसोबत डान्स करतानाचा एक व्हिडीओ काढून तो देखील सोशल मीडियावर व्हायरल केला.
ही बाब मानपाडा पोलिसांना समजताच त्यांनी पाटील विरोधात गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली. त्याच्याकडून त्याची परवानाधारक बंदूक आणि पाच जिवंत काडतुस असा ५५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्याकडे एक बेकायदेशीर कुकरी देखील आढळून आली असून कुकरी आणि मर्सिडीज कार असा 65 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पाटील याच्याविरोधात मानपाडा, कोळशेवाडी आणि महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात एकुण सात गुन्हे दाखल असल्याची माहीती वरीष्ठ पोलीस निरिक्षक शेखर बागडे यांनी दिली.