मुंबई - मालाडमधील मालवणी भागात चार नराधमांनी एका कुत्र्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना चर्चेत आली आहे. मात्र हे वृत्त खोटं असल्याचा दुजोरा मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे यांनी लोकमतशी बोलताना दिला. रस्त्यावरील कुत्र्याला दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहिती फटांगरे यांनी दिली. तसेच त्या कुत्र्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यात कुठेही सामूहिक बलात्कार केल्याचे निष्पन्न झालेले नाही असे पुढे फटांगरे म्हणाले.
दुखापतीनंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या कुत्र्याला एका रिक्षाचालकाने प्राण्यांच्या रुग्णालयात दाखल केले. या कुत्र्यावर सध्या अॅनिमल मॅटर टू मी या संस्थेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. मालवणी चर्च परिसरात एका रिक्षावाल्याला झाडीतून कुत्र्याच्या ओरडण्याचा आवाज आल्याने तो झाडीच्या दिशेने गेला. तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कुत्राविषयी त्या रिक्षाचालकाने सुधा फर्नांडीस या प्राणीमित्र महिलेला याविषयी सांगितले. त्यानंतर त्या दोघांनी त्या कुत्र्याला रुग्णालयात दाखल केले.