नागपूर : बिटकॉईनच्या माध्यमातून तीन महिन्यांत दुप्पट नफा देण्याच्या नावाखाली नागपुरकरांची फसवणूक करणाऱ्या मलेशियाच्या सायबर गुन्हेगाराला नागपूर पोलिसांनी दिल्ली विमानतळावरून अटक केली.माईक लुसी उर्फ बहारूद्दीन बिन युनूस (रा. मलेशिया) असे आरोपीचे नाव आहे. माईक याने भारतात निषेध वासनिक नावाच्या दलालाला हाताशी धरुन संपूर्ण राज्यात कोट्यवधीने गंडा घातला होता.
माईक लुसी याने काही वर्षांअगोदर ‘फ्युचर बिट कंपनी’ स्थापन केली. त्यानंतर त्याने पंचतारांकित हॉटेल्समध्ये सेमिनार आयोजित करून उपस्थितांना बिट क्वाईन बाबत माहिती दिली. जर कंपनीच्या माध्यमातून बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केली तर तीन महिन्यांत गुंतवलेली रक्कम दुप्पट होईल असा दावा त्याने केला होता. त्याने ऑनलाईन बिटकॉईन खरेदी करण्याची प्रक्रियादेखील समजावून सांगितली होती. त्यानंतर अनेक गुंतवणूकदारांनी त्याच्या कंपनीत गुंतवणूक केली. २०१७ साली माईकने संकेतस्थळ बंद केले व कुणालाही पैसे न देता पळ ठोकला. त्यानंतर ३८ लाख गमावलेल्या गुंतवणूकदारांच्या तक्रारीवरून नागपुरात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी निषेध वासनिक, अभिजीत शिरगीरवार, गोंदियातील कृष्णा भांडारकर, शामी जैस्वाल यांना अटक केली होती. तर माईकविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. माईक देशातून पळ काढणार असल्याची माहिती नागपूर पोलिसांना कळाली. दिल्ली विमानतळावरून हवाई मार्गाने तो बाहेर देशात जाण्याच्या तयारीत होता. नागपूर पोलिसांच्या पथकाने दिल्ली विमानतळावरून पोहोचून माईकला अटक केली. आरोपीला नागपुरात आणण्यात आले व त्याला १२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्या तपासातून इतर गुन्हेदेखील समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.