उत्तर प्रदेशच्या आझमगढमध्ये हायटेक तुरुंग उभारण्यात आला आहे. या तुरुंगात न्यायालयाच्या आदेशानुसार कैद्यांची एचआयव्ही चाचणी घेण्यात येत आहे. तुरुंगात किती एचआयव्ही बाधित कैदी आहेत, हे पाहण्यासाठी ही तपासणी सुरु आहे. जवळपास निम्म्या कैद्यांची तपासणी झाली आहे. यात १० कैदी एचआयव्ही बाधित सापडल्याने खळबळ उडाली आहे.
तुरुंगातील अनेक कैदी एचआयव्ही चाचणी करण्यास टाळाटाळ करत आहेत, यामुळे तुरुंग प्रशासनात खळबळ उडाली आहे. या तुरुंगात २५०० महिला आणि पुरुष कैद्यांना ठेवण्यात आले आहे. या चाचणी प्रक्रियेत अनेक कैदी सहभागी होत नाहीएत. यामुळे आतापर्यंत निम्म्याच कैद्यांची चाचणी घेण्यात आली आहे.
महिला कैद्यांनी एचआयव्ही चाचणी केली आहे, परंतू पॉझिटिव्ह सापडलेल्या कैद्यांमध्ये महिला आहेत का, याचा खुलासा होऊ शकलेला नाही. आतापर्यंत आरोग्य विभागाने 1,322 कैद्यांची तपासणी केली आहे. "न्यायालयाच्या आदेशानुसार कैद्यांची एचआयव्ही चाचणी केली जात आहे. आतापर्यंत एकूण 10 रुग्ण एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सर्वांना सामान्य कैद्यांप्रमाणे ठेवण्यात आले आहे.", असे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. आयएन तिवारी यांनी सांगितले.
सध्या कैद्यांना औषधे दिली जात आहेत. एखाद्या कैद्याला काही समस्या असल्यास त्यानुसार उपचार सुरू केले जातील. एचआयव्ही हा दोन प्रकारे होतो. एकतर संक्रमित रक्ताच्या संक्रमणाद्वारे होतो किंवा तो असुरक्षित शारीरीक संबंधातून होतो. या कैद्यांना संसर्ग कसा झाला याचा तपास केला जात आहे.", असेही ते म्हणाले.