मुंबई - राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष कोर्टाने २००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींविरोधात बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्याअन्वये (यूएपीए) खटला चालवण्याच्या निर्णयाला मुख्य आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित यांनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिले होते. यावरील सुनावणी काल न्यायमुर्ती अनुपस्थित असल्यामुळे आज घेण्यात आली. त्यानतंर, आज हायकोर्टाने यावर येत्या सोमवारी सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कर्नल पुरोहित यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
२००८ मध्ये मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी आज मुंबई हायकोर्टात सर्व आरोपींवर यूएपीएअन्वये आरोप निश्चिती होणार होती. परंतु आज काही आरोपी कोर्टात अनुपस्थित राहिल्याने आणि त्याआधी कर्नल पुरोहित यांच्या याचिकवेर निर्णय येईपर्यंत कोर्टाने ३० ऑक्टोबरपर्यंत युएपीएअंतर्गत आरोप निश्चितीला स्थगिती देण्यात आली आहे.