उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मामीच्या प्रेमात भाचा एवढा वेडा झाली की त्याने थेट मामाचा काटाच काढला. चुलत भाऊ आणि एका मित्राच्या मदतीने मामाची निर्घृण हत्या केली. पोलिसांनी या खळबळजनक प्रकरणाचा खुलासा केला आहे आणि तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संदीपान घाट पोलीस स्टेशन हद्दीतील सिकंदरपूर बजहा गावात ही घटना घडली आहे. झाडाखाली मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. महेंद्र प्रजापती उर्फ छोटू असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव होतं. पोलिसांनी मोबाईल लोकेशन आणि कॉल डिटेल्स तपासले. कुटुंबातील सदस्यांची चौकशी केल्यानंतर आकाश, रोहित आणि विजय या तिघांना अटक करण्यात आली आहे.
चौकशीदरम्यान आरोपी आकाशने धक्कादायक खुलासा केला. त्याने सांगितले की, महेंद्र हा त्याचा मामा होता. आकाश म्हणाला की, तो त्याच्या मामीवर प्रेम करत होता. तो आधीच दोनदा तिच्यासोबत घरातून पळून गेला होता, ज्यामुळे कुटुंबात खूप तणाव निर्माण झाला होता. नातेवाईकांनी पंचायतीद्वारे हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये मामाने आकाशला खूप शिवीगाळ केली आणि अपमान केला. या प्रकरणामुळे आकाशच्या मनात सूडाची भावना निर्माण झाली.
आकाशने त्याचा चुलत भाऊ रोहित आणि मित्र विजयसोबत मिळून मामाची हत्या करण्याचा कट रचला. त्या तिघांनी महेंद्रला एका निर्जन ठिकाणी बोलावलं आणि त्याच्या डोक्यात वार करून त्याची निर्घृण हत्या केली. यानंतर मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आला, जेणेकरून हे प्रकरण अपघातासारखे वाटेल. अटक केलेल्या आरोपींकडून मोबाईल, कपडे आणि गुन्ह्यात वापरलेली बाईक जप्त करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.