कल्याण : कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा प्रणव याला त्याच्याच फर्ममध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करणाऱ्या आशीषकुमार चौधरी या तरुणाने ३९ लाख २० हजार रुपयांचा गंडा घातल्याच्या प्रकार जुलैमध्ये उघडकीस आला होता. प्रणवच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आशीषकुमार विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. अखेर आशीषकुमार याला अंबरनाथ येथून अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशीषकुमार याने शिक्षणासाठी ईआरपी सॉफ्टवेअर विकसित करून त्याद्वारे फर्मला अधिक फायदा करून देण्याचे आश्वासन दिले होते. डॉ. डी. वाय. पाटील संस्था आणि जळगाव विद्यापीठ यांना सॉफ्टवेअर विकत असल्याबाबत बनावट ई-मेल करून जळगाव विद्यापीठ यांच्याबरोबर बनावट ॲग्रीमेंट करून ते प्रणवच्या फर्मकडे सादर केले गेले होते. दरम्यान, ईआरपी सॉफ्टवेअर तयार करण्याच्या उद्देशाने फर्मच्या बँक खात्यावरून ३९ लाख २० हजार रुपयांची रक्कम २०१८ ते २०२० या कालावधीत टप्प्याटप्याने आशीषकुमार याने आरटीजीएसद्वारे स्वत:च्या बँक खात्यात हस्तांतरित करीत फसवणूक केली होती.
आमदार पुत्राला ३९ लाखांचा गंडा घालणारा अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 8:23 AM